वृत्तसंस्था/ हरारे
हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर रविवारी दुसऱया वनडे सामन्यात वेस्ले मधेवेरेच्या अर्धशतकामुळे झिंबाब्वेने 50 षटकांत 9 बाद 240 धावा जमवित बांगलादेशला विजयासाठी 241 धावांचे आव्हान दिले.
तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन दिवसापूर्वी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान झिंबाब्वेला बांगलादेशकडून 155 धावांनी दणदणीत पराभव स्वीकारावा लागला होता. 2023 साली होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीच्या पात्रफेरी अंतर्गत हे सामने खेळविले जात आहेत. रविवारच्या दुसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिंबाब्वेने 50 षटकांत 9 बाद 240 धावा जमविल्या. मधेवेरने अर्धशतक (56) तर कर्णधार टेलरने 46 धावा, मेयर्सने 34 तर रझाने 30 धावांचे योगदान दिले. बांगलादेशतर्फे एस. इस्लामने 4 तर शकीब अल हसनने 2 गडी बाद केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर झिंबाब्वेच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. सलामीची जोडी तिनाशे कामुन्हुकामव्हेने 1 तर मरुमनीने 13 धावा जमविल्या. छकब्वाने 32 चेंडूत 2 चौकारांसह 26 धावा जमविल्या. कर्णधार टेलरने 57 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 46 धावा जमविल्यानंतर तो स्वयंचीत झाला. मधेवेरेने 63 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 56, मेयर्सने 59 चेंडूत 1 चौकारांसह 34 तर रझाने 44 चेंडूत 2 चौकारांसह 30 धावा जमविल्या. झिंबाब्वेच्या डावात 2 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे एस. इस्लामने 46 धावांत 4 तर शकीब अल हसनने 42 धावांत 2 तसेच तस्किन अहमद, सैफुद्दीन आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः झिंबाब्वे 50 षटकांत 9 बाद 240 (मधेवेर 56, टेलर 46, मेयर्स 34, रझा 30, एस इस्लाम 4-46, शकीब अल हसन 2-42, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद आणि सैफुद्दीन प्रत्येकी एक बळी).









