श्रीकृष्ण रुक्मिणी विवाहाची कथा वर्णन करताना एकनाथ महाराज पुढे म्हणतात-
सावधान आचार्य म्हणती । झाली रुखवताची आइती । संतोषली शुद्धमती । भावें श्रीपती प्रार्थिला। कृष्ण परमात्मा भव्यमूर्ती । आवरणपूजा यादवपंक्ती। लाविल्या स्वप्रकाशवाती । शुद्धमती सावध । तळीं त्रिगुणाची आडणी । त्यावरी ताटाची मांडणी । वाढिताती नवजणी । खुतखावणी जाणोनि। ऐका रुकवताची स्थिती । वाढीतसे शुद्धमती । जे जे धाले कृष्णपंक्ती । क्षुधा पुढती त्यां नलगे ।झळकती खावार्थाचीं ताटें । जडित चतुर्विध चोखटें । स्वानंदरसें भरिली वाटे । वोतू काठें नेणती । झाणिवा खुडिवा तोडिवा । त्रिगुण गुणांच्या सोलिवा। शाका वढिती स्वानुभवा । हावभावा फोडणिया ।
आचार्यांनी सूचना केल्याप्रमाणे राणी शुद्धमतीने रुखवताची तयारी केली. कृष्ण मध्यभागी बसले होते. दोन्ही बाजूंनी यादवांच्या पंक्ती बसल्या होत्या. त्रिगुणाच्या आडणीवर ताटांची मांडणी केली होती. शुद्धमती वाढत होती. जे जे कृष्णाकडे पाहत होते, त्यांची भूक आपोआप शमत होती. भावार्थाची ताटे झळकत होती. त्यात स्वानंदरस भरला होता. त्यामुळे इतर रस कोठे ओतावेत हे कळत नव्हते. अनेक प्रकारच्या भाज्या तयार केल्या होत्या.
एकें पचली गोडपणें । एकें सप्रेम सलवणें ।
एकें नुसतीं अलवणें । बरवेपणें मिरविती ।
एके सबाह्य आंबटें । एकें अर्धकाची तुरटें ।
एकें बहुबीजें कडवटें । एकें तिखटें तोंडाळें ।
एकें हिरवीं करकरितें । एकें परिपक्वें निश्चितें ।
एकें जारसे कचकचित्तें । एकें स्नेहदेठिंहूनी सुटलीं । वाळल्या आनुतापकाचरिया । वैराग्यतळणें अरुवारिया । राजसा वाढिला कोशिंबिरिया । नाना कुसरी राइतीं । मुखीं घालिता अतितिखटीं । नाकीं तोंडी धूर उठी । कुसुमुसुनी कपाळ पिती । दुसरेनि गोष्टी न करवे । एकें वाळोनि कोरडीं । तोंडीं घालिता कुडकुडी ।
त्यांची अनारिसी गोडी। बहु परवडी स्वादाची ।
आंबट, खारट, तुरट, गोड, तिखट अशा विविध स्वादाच्या भाज्या होत्या. विविध प्रकारच्या कोशिंबिरी वाढल्या होत्या.
वळवटाची नवलपरी । एकें पोपळें अभ्यंतरिं ।
एकें वर्तुळें साजिरिं । सुमनाकारिं पैं एक ।
परवडी दावी यादवराया । सूक्ष्म सेवेच्या शेवया ।
मोडों नेदि सगळिया । अतिसोज्वळिया सतारा ।
शेवया वळिल्या अतिकुसरी । असार केवळ सांडिलें दूरी । घोळिल्या क्षीरसाखरिं । चवी जेवणारिं जाणिजे। अत्यंत लाडें वळिले लाडु । विवेकतिळवियाचे जोडु। सुरस रसें रसाळ गोडू । चवीनिवाडु हरि जाणे । पापड भाजिले वैराग्यआगीं। तेणें ते फुगले सर्वांगी । म्हणोनिया ठेविले मागिले भागीं । नखें सवेगीं पीठ होती । उकलतां नुकलती। आंतल्या आंत गुंडाळती। तापल्या तेलें तळिजेती। कुडी आइती कुरवडिया। भीमकी प्रिय व्हावी श्रीपती । सांडया न करीच शुद्धमती ।
जाणे वृद्धाचाररीती । परम प्रीति बोहरांची ।
Ad. देवदत्त परुळेकर