ऑनलाईन टीम / रांची :
कोरोना विषाणू दुसऱ्या लाटेत देशभरात अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. अनेक राज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी केला आहे. झारखंडमध्ये देखील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने एक मोठा निर्णय घेत राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मंगळवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, 22 ते 29 एप्रिल या कालावधित हा लॉकडाऊन लागू असणार आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता झारखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने जारी केलेल्या या लॉकडाऊनला सुरक्षा सप्ताह असे नाव दिले आहे.

या काळात अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व गोष्टी बंद असणार आहेत. या काळात राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सुरु राहणार आहेत. मात्र, या ठिकाणी भाविकांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच खाणकाम, शेती आणि बांधकाम करण्याससुद्धा सरकारने परवानगी दिलेली आहे. यासोबतच राज्यात कलम 144 चे पालन केले जाणार आहे.
दरम्यान, झारखंडमध्ये मागील 24 तासात 3,992 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे येथील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 62 हजार 945 वर पोहोचली आहे. तर सध्या येथे 28,010 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 1456 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.









