बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याशेजारी झाडे-झुडुपे वाढल्याने वाहनधारक-पादचाऱयांना बनताहेत धोकादायक
प्रतिनिधी / बेळगाव
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येणाऱया रस्त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी खात्याची आहे. मात्र ही जबाबदारी व्यवस्थित सांभाळण्याकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या बेळगाव-वेंगुर्ला मार्गाशेजारी साईडपट्टय़ांवरील कचरा आणि रस्त्याशेजारील वाढलेली झाडे-झुडुपे हटविण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र हे काम दिखाऊपणाचे असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
बेळगाव-वेंगुर्ला मार्गाशेजारी ठिकठिकाणी गवत आणि झाडे-झुडुपे वाढल्याने रस्त्यावर अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून वाहनधारकांना अडचणींचे बनले आहे. मागीलवषी रस्त्याचे रुंदीकरण करून दुतर्फा रस्ता वाढविण्यात आला होता. मात्र या रस्त्यावर सध्या गवत आणि झाडे-झुडुपे वाढली आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्याच्या देखभालीचे वार्षिक कंत्राट देण्यात येते. मात्र कंत्राटदारांकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. पावसाळय़ात रस्त्याशेजारी झाडे-झुडुपे वाढल्याने वाहनधारक तसेच पादचाऱयांना धोकादायक बनले आहे. अशातच नागरिक रस्त्याशेजारी कचरा टाकत असल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे. तसेच वळणे असलेल्या ठिकाणी झाडांझुडुपांमुळे वाहनधारकांना समोरून येणारी वाहने दिसत नाहीत.
विशेषतः विनायकनगर, विजयनगर आदी भागात ही समस्या निर्माण होत आहे. गणपती मंदिरच्या मागील बाजूस असलेल्या वळणावर एका बाजूस पेट्रोलपंप तर दुसऱया बाजूला झाडे-झुडुपे आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्रास अपघात होत असतात. ही झाडे-झुडुपे हटविण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. त्यामुळे वार्षिक देखभालीसाठी कंत्राट देण्यात येते. याअंतर्गत दरवषी कामगारांकरवी रस्त्याशेजारील झाडे-झुडुपे हटविण्यात येत होती. मात्र मागील वर्षापासून हे काम जेसीबीद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याशेजारी वाढलेली झाडे व्यवस्थित हटविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. केवळ रस्त्यावर साचलेला कचरा आणि माती जेसीबीद्वारे हटविली जाते. पण वाढलेली झाडे-झुडुपे जैसे थे आहेत. सध्या जेसीबीद्वारे हे काम सुरू असून दिखाऊपणाचे होत असल्याची टीका नागरिक करीत आहेत.