इस्लामिक रिसर्च फौंडेशनवर युएपीए अंतर्गत बंदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईकच्या नेतृत्वाखालील इस्लामिक रिसर्च फौंडेशनवर (आयआरएफ) घालण्यात आलेल्या बंदीचा कालावधी 5 वर्षांनी वाढविला आहे. नाईक सध्या मलेशियात वास्तव्यास आहे. आयआरएफला 17 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारकडून युएपीए अंतर्गत अवैध संघटना घोषित करण्यात आले होते.
देशाच्या सुरक्षेसाठी हानिकारक असलेल्या आणि शांतता तसेच सांप्रदायिक सौहार्द तसेच देशातील धर्मनिरपेक्ष सलोखा बिघडविण्याची क्षमता असलेल्या कारवायांमध्ये आयआरएफ सामील असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे. नाईककडून करण्यात आलेली वक्तव्ये आणि भाषणे आक्षेपार्ह आणि विध्वंसक असल्याचे गृह मंत्रालयाने नमूद केले आहे.
द्वेष फैलावण्याचा आरोप
स्वतःच्या भाषणांद्वारे झाकीर धार्मिक समुहांदरम्यान शत्रुत्व आणि द्वेषाला खतपाणी घालत आहे. भारत आणि विदेशातील एका विशेष धर्माच्या तरुणांना दहशतवादी कृत्यं करण्यास झाकीर चिथावणी देत आहे. आंतरराष्ट्रीय उपग्रह टीव्ही नेटवर्क, इंटरनेट, मुद्रीत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लाखो लोकांसाठी कट्टरवादी विधाने आणि भाषणे झाकीर करत असतो असे गृह मंत्रालयाकडून म्हटले गेले आहे.
प्रत्यार्पणाचा प्रयत्न
झाकीर नाईकच्या विरोधात भारतात अनेक गुन्हे नोंद असून तो एक फरार आरोपी आहे. मलेशियातून त्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. सर्व पैलू विचारात घेत आयआरएफवरील बंदी 5 वर्षांनी वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे गृहमंत्रालयाने नमूद केले आहे.









