काँग्रेस पक्षाची मागणी
प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील झवेरीच्या ड्रग्ज रेव्ह पार्टीतील सहभागाची तसेच तिरुमाला तिरुपती क्रेडिट सोसायटीच्या राज्यातील 10 शाखांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली असून त्यातूनच खोटे कोण ? हे जनतेला कळेल असे पक्षाने म्हटले आहे. भाजपचे अनेक नेते झवेरीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याची छायाचित्रेही काँग्रेसतर्फे पत्रकार परिषदेत सादर केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्याकडे झवेरीची कसली अधिकृत भेट झाली त्याचाही खुलासा त्यांनी करावा, असेही काँग्रेस पक्षाने सुचविले असून अमलीपदार्थ व्यवहार हा भाजपचा कौटुंबिक धंदा असल्याचा पुनरुच्चार काँग्रेस पक्षाने केला आहे.
काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी भाजप आमदार ग्लेन टिकलो, रमेश तवडकर, नरेंद्र सावईकर व इतर नेत्यांचा समावेश असलेली झवेरीसोबतची कार्यक्रमातील अनेक छायाचित्रे उघड केली. प्रकाश वेळीप हे दिगंबर कामत यांचे 2007 ते 2012 पर्यंत ओएसडी होते. पण नंतर ते भाजपच्या कळपात गेले आणि अमित शहा, स्मृती इराणी, विनय तेंडुलकर, मनोहर पर्रीकर यांच्यासोबत पुढे पोहोचले हे पणजीकर यांनी छायाचित्रे दाखवून स्पष्ट केले. काँग्रेसवर आरोप करणारे भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक या छायाचित्रांबाबत मुग गिळून गप्प बसले अशी टीका पणजीकर यांनी केली. भाजपचे प्रवक्ते नाईक हे दामू नाईक, तवडकर व वेळीप समवेत असलेले छायाचित्रेही पणजीकर यांनी सादर करून भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी भाजपमध्ये खोटे कोण बोलतो असा प्रश्न भाजपला केला होता, त्याचे उत्तर मात्र भाजपने दिले नाही. काँग्रेस पक्षाने कधीच खोटेपणा केला नसल्याचे पणजीकर यांनी नमूद केले आणि या सर्व प्रकरणाची दूध का दूध पानी का पानी’ होऊन जाऊ दे, अशी चौकशी करण्याचे आव्हान सरकारला दिले. त्यानंतर राज्यपालांच्या बदलीचा निषेध म्हणून काँग्रेसच्या निवडक पदाधिकाऱयांनी आझाद मैदानावर धरणे धरून निदर्शने केली.