सलग तीन पराभवांमुळे मुंबईसमोर उर्वरित सर्व सामने जिंकण्याचे आव्हान
अबु धाबी / वृत्तसंस्था
हॅट्ट्रिक पराभवाचा जबरदस्त झटका बसलेल्या मुंबई इंडियन्ससमोर आज (मंगळवार दि. 28) आयपीएल साखळी सामन्यात तितक्याच खराब फॉर्ममधील पंजाब किंग्सचे आव्हान असेल. युएईच्या या टप्प्यात सलग 3 सामने गमावल्याने मुंबईचा संघ बिकट स्थितीत असून उर्वरित सर्व सामने मोठय़ा फरकाने जिंकण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. मुंबईचा संघ सध्या 10 सामन्यात 8 गुणांसह अगदी सातव्या स्थानापर्यंत घसरला आहे.
पाच वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध धावांचा यशस्वी पाठलाग करु शकला नाही तर केकेआरविरुद्ध लढतीत धावांचे संरक्षण करु शकला नव्हता. मुंबईसाठी फलंदाजीची मुख्य चिंता असून यातही प्रामुख्याने सुर्यकुमार यादव व इशान किशन सातत्याने झगडत आहेत.
कर्णधार रोहित शर्माने मागील 2 लढतीत अनुक्रमे 33 व 43 धावा केल्या. मात्र, या उत्तम प्रारंभाचे तो मोठय़ा खेळीत रुपांतर करु शकलेला नाही. मुंबईला यंदा खेळाडूंच्या दुखापतीने देखील बरेच त्रस्त केले असून हार्दिक पंडय़ा याचे उत्तम उदाहरण आहे. पंडय़ा पहिल्या दोन सामन्यात खेळू शकला नाही आणि तिसऱया सामन्यात फार काळ टिकून राहू शकला नाही.
गोलंदाजीत जसप्रित बुमराह सातत्यपूर्ण योगदान देत मागील 3 सामन्यात 8 बळी घेऊ शकला तर ट्रेंट बोल्ट, ऍडम मिल्ने यांनीही प्रत्येकी 3 बळी घेतले आहेत. राहुल चहर व कृणाल पंडय़ा यांनी मात्र सपशेल निराशा केली आहे. मुंबईला जर बाद फेरीसाठी पात्रता मिळवायची असेल तर या खेळाडूंना आपला खेळ कोणत्याही परिस्थितीत उंचावणे भागच असणार आहे.
पंजाबच्या खात्यावर 4 विजय
मागील सामन्यात विजयाच्या ट्रकवर परतणारा पंजाब किंग्सचा संघ सोमवारच्या लढतीपूर्वी पाचव्या स्थानी होता. त्यांनी मागील लढतीत सनरायजर्स हैदराबादला पराभवाचा धक्का दिला होता. अर्थात, येथे मुंबईप्रमाणे पंजाब किंग्सला देखील पराभव पचणारा नसेल, हे निश्चित आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्ध शेवटच्या षटकात 4 धावाही जमवू न शकलेल्या पंजाबने मागील लढतीत 3 बदल केले होते आणि आताही ते काही प्रयोग राबवू शकतात. कर्णधार केएल राहुल व मयांक अगरवाल यांनी आघाडीवर बऱयाच धावा केल्या आहेत. शिवाय, ख्रिस गेल, एडन मॅरक्रम, निकोलस पूरन यांच्यामुळे पंजाबची फलंदाजी आणखी मजबूत आहे. मात्र, मागील लढतीत पंजाबचे फलंदाज संथ खेळपट्टीशी जुळवून घेऊ शकले नव्हते. गोलंदाजीत मोहम्मद शमी व अर्शदीप सिंग यांनी उत्तम मारा केला तर रवि बिश्नोईने मागील लढतीत संधी मिळताच 3 बळी घेतले होते.
संभाव्य संघ
पंजाब किंग्स ः केएल राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, शाहरुख खान, मोहम्मद शमी, नॅथन इलिस, आदिल रशिद, मुरुगन अश्विन, हरप्रीत ब्रार, मोईसेस हेन्रिक्यूज, ख्रिस जॉर्डन, एडन मॅरक्रम, मनदीप सिंग, दर्शन नळकांडे, प्रभसिमरन सिंग, रवी बिश्नोई, उत्कर्ष सिंग, फॅबियन ऍलन, सौरभ कुमार, जलज सक्सेना.
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा (कर्णधार), क्विन्टॉन डी कॉक, इशान किशन, सुर्यकुमार यादव, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, जेम्स नीशम, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, मार्को जान्सन, युधवीर सिंग, ऍडम मिल्ने, धवल कुलकर्णी, जसप्रित बुमराह, मोहसिन खान, नॅथन काऊल्टर-नाईल, पीयूष चावला, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.
मुंबईच्या ‘त्या’ खेळाडूंचा खराब फॉर्म बीसीसीआयसाठी देखील चिंतेचा!
मुंबई संघातील थोडेथोडके नव्हे तर चक्क 6 खेळाडू भारताच्या टी-20 वर्ल्डकप संघात समाविष्ट असून या खेळाडूंचा खराब फॉर्म केवळ मुंबई प्रँचायझीसाठीच नव्हे तर भारतीय संघव्यवस्थापनाकरिता देखील चिंतेचा आहे. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, इशान किशन, राहुल चहर, हार्दिक पंडय़ा, जसप्रित बुमराह असे मुंबई इंडियन्स संघातील 6 खेळाडू भारताच्या वर्ल्डकप संघात देखील समाविष्ट आहेत.









