वॉशिंग्टन :
डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षीय आणि उपाध्यक्षीय उमेदवारांनी हिंदूंना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदूंचा सण नवरात्र सुरू झाला आहे. अमेरिका आणि जगात हा सण साजरा करणाऱया लोकांना मी आणि माझी पत्नी (जिल बिडेन) शुभेच्छा देत आहोत. पुन्हा एकदा असत्यावर सत्याचा विजय व्हावा. सर्वांना नवी संधी मिळावी आणि नवी सुरुवात व्हावी असे ज्यो बिडेन यांनी ट्विट करत म्हटले आहे.
उपाध्यक्षीय उमेदवार कमला हॅरिस यांनी शुभेच्छांचा ट्विट केला आहे. मी आणि माझे पती (डगलस एमहोफ) नवरात्र साजरी करणाऱया हिंदू अमेरिकन मित्र आणि बंधूंना शुभेच्छा देते. हा सण आम्हा सर्वांना स्वतःचा समुदाय पुढे नेण्यासाठी प्रेरित करेल अशी अपेक्षा असल्याचे हॅरिस यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
अमेरिकेत सुमारे 20 लाख हिंदू
अमेरिकेत सुमारे 20 लाख हिंदूंचे वास्तव्य आहे. अध्यक्षीय निवडणुकीत हिंदूंची भागीदारी रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची आहे. दोन्ही पक्ष हिंदू मतदारांना आकर्षित करू पाहत आहेत. अमेरिकन भारतीयांना स्वतःसोबत आणण्याचा प्रयत्न यापूर्वीही होत आला आहे. अमेरिकेत हिंदू धर्माच्या लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 1 टक्के आहे. हा देशातील चौथा सर्वात मोठा धर्म आहे.
ट्रम्प यांचेही प्रयत्न
हिंदूंना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्पही मागे नाहीत. त्यांनी 14 ऑगस्ट रोजी ‘हिंदू वॉयसेस फॉर ट्रम्प’ मोहिमेची घोषणा केली होती. अमेरिकेच्या विकासात लाखो हिंदूंनी दिलेल्या योगदानाचा आम्ही सन्मान करतो. अमेरिकेत हिंदू आणि जैन धर्मासमवेत अन्य धर्माच्या लोकांवर अनेकदा हल्ले होतात. हे हल्ले रोखण्याची मागणी दीर्घकाळापासून होत आल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.
बिडेन अन् हिंदी गाणी
बिडेन हे भारतीय अमेरिकनांना आकर्षित करण्यासाठी बॉलिवूड गाण्यांचा वापर करत आहेत. त्यांच्या प्रचारमोहिमेने लगान चित्रपटातील ‘चले चलो’ गाण्याच्या धर्तीवर सांगितिक चित्रफित प्रसिद्ध केली आहे. यात बिडेन यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमेरिकेत 10.3 लाख भारतीय अमेरिकन मतदार आहेत.









