ऑनलाईन टीम / पुणे :
स्त्रीवादाच्या भाष्यकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज दुपारी त्यांचे पार्थिव प्रभात रोडवरील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आजच संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी 1958 मध्ये बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली होती. पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर 1964 ते 1983 या काळात ‘स्त्री’ मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादक झाल्या आणि 1983 ते 86 या काळात मुख्य संपादक होत्या. तेथून बाहेर पडल्यावर त्यांनी ऑगस्ट 1989 मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक सुरू केले.. या मासिकाच्या त्या संस्थापक-संपादक होत्या. मासिकात पहिल्या 20 वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक 45 लेखांच्या संग्रहाचे ’स्त्रीमिती’ नावाचे पुस्तक 2012 साली प्रसिद्ध झाले. विद्या बाळ यांच्या ’नारी समता मंच’ या संघटनेने गावोगावी जाऊन वाहत्या रस्त्यांवर ‘मी एक मंजुश्री’ नावाचं प्रदर्शन भरवले होतं. या प्रदर्शनाने अख्खा महाराष्ट्रच ढवळून निघाला होता.









