ऑनलाईन टीम / कोलकाता :
ज्येष्ठ बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. कोरोना प्रेरित एन्सेफॅलोपॅथीमुळे मागील महिनाभरापासून चॅटर्जी यांची प्रकृती खालावली होती. कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.
चॅटर्जी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 6 ऑक्टोबरला त्यांना कोलकाता येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
14 ऑक्टोबरला त्यांची पुन्हा चाचणी घेण्यात आली. तेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, कोरोना प्रेरित एन्सेफॅलोपॅथीमुळे त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांनी जगाचा निरोप घेतला.
चॅटर्जी यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (2012) आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2018 मध्ये फ्रेंच सरकारने त्यांना लिजन ऑफ ऑनरने सन्मानित केले. हा फ्रान्सचा सर्वात मोठा नागरिकत्व सन्मान आहे.









