बेडकिहाळसह निपाणी तालुक्यात शोककळा
वार्ताहर / बेडकिहाळ
जिल्हय़ातील धडाडीचे नेते राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व, युवकांचे प्रेरणास्थान, बेडकिहाळचे ज्ये÷ नेते व मार्गदर्शक गोपाळ दादा पाटील (वय 81) यांचे मंगळवार दि. 25 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा दत्तकुमार पाटील, सून सुप्रिया पाटील, चार मुली, चार भाऊ, पुतणे व नातवंडे असा परिवार आहे. बेडकिहाळ व निपाणी परिसरात ते दादा म्हणूनच ओळखले जात होते.
गोपाळ दादा पाटील यांची 1978 मध्ये चिकोडी तालुका पंचायत बोर्ड कमिटीवर सदस्य म्हणून निवड झाली होती. तर निपाणीच्या हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी धुरा सांभाळली होती. बेडकिहाळ येथील श्री सरस्वती पेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे संस्थापक आहेत. बेडकिहाळ अर्बन बँकेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष, तसेच बेडकिहाळ येथील श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक व कल्याण सिद्धेश्वर प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे संस्थापक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना डॉ. जे. पी. नाईक पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
बेडकिहाळ व परिसरातील कोणताही न्याय निवडा करण्यात त्यांचा हातखंडा होता. तसेच व्यंकटेश्वरा साखर कारखाना उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग असून त्यांनी संचालक म्हणून देखील काम पाहिले होते. ते निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे व्याही होत. गोपाळ दादांच्या अचानक जाण्याने शोककळा पसरली आहे. बेडकिहाळ येथील व्यापारी संघटनेच्यावतीने गावातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. गुरुवार दि. 27 रोजीही ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. 27 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.









