प्रतिनिधी / कोल्हापूर
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आणि शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाटय़शास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. भारती वैशंपायन (वय 66, रा. खानविलकर पेट्रोल पंपाजवळ) यांचे रविवारी सकाळी अकरा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती अविनाश वैशंपायन, मुलगा केदार, मुलगी मीरा आणि मधुरा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे रक्षाविसर्जन होणार आहे. डॉ. वैशंपायन यांच्या निधनाने शास्त्राrय संगीतातील गाढय़ा अभ्यासक हरपल्याची भावना कला क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
डॉ. वैशंपायन यांचा जन्म 1 जानेवारी 1954 रोजी सांगली येथे झाला. त्यांच्या माहेरचे ताम्हणकर घराणे हे संगीत क्षेत्राशी नाळ असणारे होते. जन्मापासून संगीताचा वारसा लाभलेल्या वैशंपायन यांनी चिंतूबुवा म्हैसकर, पंडित निवृत्तीबुवा सरनाईक, पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. बाबूराव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ठुमरी आणि दादरा हे उपशास्त्राrय संगीत आत्मसात केले. एसएनडीटी विद्यापीठातून वैशंपायन यांनी संगीतात एम. ए. ची पदवी संपादन केली. 1985 मध्ये गंधर्व महाविद्यालयाने त्यांना डॉक्टरेटने सन्मानित केले. जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका म्हणून त्यांनी अनेक शहरांमध्ये असंख्य मैफिली केल्या. आकाशवाणीसाठी (ऑल इंडिया रेडिओ) 1972 पासून त्या कार्यक्रम करत होत्या. टॉप ग्रेड कलाकार आणि लाईट-क्लासिकल श्रेणीतील ‘ए’ ग्रेड त्यांनी मिळवली. हिंदुस्थानी रागावर त्यांचा अभ्यास होता. दुर्मीळ आणि प्राचीन रागांवर त्यांनी संगीत मैफली सादर करून या रागांचे संवर्धन केले.
डॉ. भारती वैशंपायन यांनी मराठी संगीत नाटकाच्या परंपरेत सक्रिय सहभाग घेतला. या क्षेत्रात त्यांनी संगीत शारदा, संगीत मानापमान, संगीत स्वयंवर यांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या संगीत स्वयंवरने दिल्ली येथील ब्रुहनमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था येथे सर्वोत्कृष्ट नाटकासाठी प्रथम क्रमांक पटकाविला. मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाचा ‘गानहिरा’ पुरस्कार मिळाला. नुकताच प्रख्यात गायिका वीणा सहस्त्रबुध्दे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाटय़शास्त्र अधिविभागाच्या उभारणीत त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 13 विद्यार्थ्यांनी संगीत विषयात पीएच. डी. मिळवली आहे. डॉ. वैशंपायन यांचे नाटय़ व गायन क्षेत्रात अनेक शिष्य आहेत. डॉ. वैशंपायन यांच्या निधनाची बातमी समजताच संगीत, नाटय़ व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या घराकडे धाव घेऊन अंत्यदर्शन घेतले. गायक विनोद डिग्रजकर, सुधीर पोटे, राजप्रसाद धर्माधिकारी, अरूण कुलकर्णी यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवरांसह मोठा शिष्य परिवार उपस्थित होता.