८५ हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये साकारल्या भूमिका
हातकणंगले तालुक्यातील रुई गावात झाले अंत्यसंस्कार
नायिकेच्या भूमिकेसह खलनायिकीची भुमिकाही ठरली लक्षणीय
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळया भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री सरोज धोंडीराम सुखटणकर (वय ८४) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. सध्या त्या हातकणंगले तालुक्यातील रुई गावात राहत होत्या.राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने २०१७-१८ मध्ये त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान केला होता. तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने २००६ मध्ये चित्रकर्मी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते. मराठी नाटक, चित्रपटात त्यांनी अभिनयाचा ठसा उमटविला होता.
कोल्हापुरातील महाडीक कॉलनी येथे त्या १९७५ च्या दरम्यान राहत होत्या.चित्रनगरीत आल्यानंतर सुरूवातीला त्यांनी `वेगळ व्हायच मला’, `मुंबईची माणस’, `एखाद्याच नशीब, `प्रेमा तुझा रंग कसा’, दसरा उजाडला’, `तुम्ही माझे बाजीराव दिवा जळू दे सारी रात, तुझं आहे तुझपाशी’ अशा अनेक नाटकात त्यांनी भुमिका केली आहे. खलनायकाचीही भूमिका त्यांनी साकारली होती. कोल्हापुर जिल्ह्यातील असल्याने कोल्हापूर चित्रनगरी आणि त्यांचे नाते जिव्हाळयाचे होते. भालचंद्र कुलकणीं, पूजा पवार, शिवाजी सावंत, छाया सांगावकर, शांता तांबे यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे.
नाटकाच्या तालमी सुरू असताना वेळेपुर्वी हजर राहात असत. आपल्या भूमिकेमध्ये एकरूप होवून अभिनय करीत होत्या. त्यामुळे प्रेक्षकही त्यांना शिट्टया टाळ्यांनी दाद देत. एनक नवख्या कलाकारांसाठी सरोज या चालत बोलत विद्यापीठच होत्या. त्यांच्या अनुभवाचा अनेक कलाकारांना फायदा झाला आहे. `धनगरवाडा’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. `तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतही त्या होत्या. गेल्या वर्षभरापासून आपल्या भाच्याकडे रूइं येथे राहत होत्या. त्यांच्या पश्चाता एक भाऊ,तीन भाचे, एक भाची असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीत पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रीया कला क्षेत्रातून येत आहेत.
अभिनेत्री सरोज यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. रुई येथील `न्यू भारत नाटयक्लब’ मधून त्यांच्या अभिनयाला सुरुवात झाली. अनंत माने, दत्ता धर्माधिकारी, राजा ठाकूर, कमलाकर तोरणे, दिनकर पाटील, मुरलीधर कापडी, अरूण कर्नाटकी, व्ही रविंद्र, गोविंद कुलकर्णी, सुभाष भुरके, दत्ताराम तावडे आदी दिग्दर्शकांच्या चित्रपटात वैशिष्टयपूर्ण भुमिका केल्या. त्यांनी सून लाडकी या घरची, कौल दे खंडेराया, `बाई मी भोळी, कुंकवाचा करंडा, जोतिबाचा नवस, सावज, सहकार सम्राट, भुजंग, धुमधडाका, एकटा जीव सदाशिव, सोयरिक, अष्टविनायक, भिंगरी, लेक चालली सासरला, दे देणादण, बळी राजाचे राज्य येऊ दे’आदी ८५ हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्यापैकी `तोतया आमदार’, `पाहुणी’, `चंदनाची चोळी’, `एकटा जीव सदाशिव’, `जावई विकत घेणे आहे’, `औंदा लगीन करायच’, `अनोळखी’ `भक्त पुंडलिक’, `अशी ही साताऱ्याची तऱहा’, `सोयरीक’, `कुंकवाचा करंडा’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या. आपल्या अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.