बेंगळूर : कन्नडसह विविध भाषेत सुमारे 500 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री जयंती (वय 76) यांचे रविवारी मध्यरात्री निधन झाले. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. सोमवारी सायंकाळी बनशंकरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
दिवंगत अभिनेते डॉ. राजकुमार, विष्णूवर्धन, अंबरिश, कल्याणकुमार, श्रीनाथ, अनंतनाग आदी कन्नड अभिनेत्यांसमवेत त्यांनी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. जेनुगुडू, बेट्टद हुली, एडकल्लू गुड्डद मेले, मसनद हुवू हे त्यांचे प्रमुख चित्रपट होत.
1945 साली बळ्ळारी येथे जयंती यांचा जन्म झाला होता. जयंती यांचे मूळ नाव कमलाकुमारी असे होते. हिंदीसह 6 भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. ‘मिस लिलावती’ या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर पाच राज्यस्तरीय पुरस्कारांच्याही त्या मानकरी ठरल्या होत्या.









