साताऱयात दिला अंतिम निरोप : मान्यवरांकडून शोक व्यक्त
प्रतिनिधी/ सातारा
जेष्ठ अभिनेत्री आणि गायिका आशालता वाबगावकर यांचे साताऱयामध्ये पहाटे प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्या 79 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने चित्र, नाटय़सृष्टी मध्ये पोकळी निर्माण झाली.
सातारा जिह्यातील फलटण तालुक्यात काळूबाई या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या आल्या होत्या. चित्रीकरण दरम्यान त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.
गेले 5 दिवस त्या प्रतिभा हॉस्पिटल मधील कोविड अति दक्षता विभागात व्हेंटिलेटरवर होत्या. परंतु अति गंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे अतिदक्षता विभाग तज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदयविकार तज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली. गेले 5 दिवस आणि मृत्यूसमयी प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल या त्यांच्या सोबत होत्या.
आशालता वाबगावकर यांच्या अभिनय कारकीर्दीतील त्यांचे मत्स्यगंधा हे नाटक मैलाचा दगड ठरले. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी साकारलेली ‘मत्स्यगंधा’ आजही रसिकांच्या स्मरणात आहे. ‘मत्स्यगंधा’ च्या यशानंतर नंतर आशालता यांनी मागे वळून पाहिलेच नाही. नाटक पूर्णवेळ करायचे असे ठरवून त्यांनी नोकरी सोडली. ‘द गोवा हिंदू असोसिएशन’, ‘चंद्रलेखा’, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘माऊली प्रॉडक्शन’, ‘कलामंदिर’, ‘आयएनटी’ आदी नाटय़संस्थांमधून त्यांनी आजवर पन्नासहून अधिक नाटके केली आहेत. तर अनेक मराठी, हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका निभावल्या. त्यांनी गायलेली ‘तू सुखकर्ता तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया’ ही आरती आजही लोकप्रिय आहे. ‘एचएमव्ही’ कंपनीने त्याची ध्वनिमुद्रिकाही काढला होती.
आदर्शवत कलावंतास मुकलो
सिनेमा क्षेत्रांतील आदर्श विचारांचा व संस्कारक्षम संस्कृती जपून त्यांच्या आदर्श अंगिकारले आम्ही कलावंत आज आशालताच्या जाण्याने आम्ही पोरके झाल्याची खंत व्यक्त त्यांचा आदर्शवत यापुढे जपणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशी भावना अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांनी व्यक्त केली.
अभिनयातील तारा निखळला
अशालतांच्या जाण्याने एक अभिनयातील भरून न येणारा तारा आज निखळला त्यांच्या अभिनयाच्या पैलुतून आम्ही तर पोरके झालोच पण लाखो लोकांच्या हृदयात कायम आपल्या अभिनयाच्या आठवणीने प्रेरणा मिळेल, अशी श्रध्दांजली सिने, मालिका पटकथा व नाटय़लेखक प्रताप गंगावणे यांनी व्यक्त केली.
आशाताईंचे जाणे सर्वांनाच दुःखदायक
कलावंतांना प्रेरणा देणाऱया आशालता वाबगावकर यांच्या निधनाने आज सातारच्या नव्हे तर राज्याच्या कलाक्षेत्रातील अभिनयाच्या महामेरू असलेल्या या गुणी अभिनेत्रीच्या जाण्याने दुःख अनावर झालेय. त्यांच्या आठवणींचा सातारच्या कलाकार व जनतेस कधीच विसर पडणार नाही, अशी भावना बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केली.









