नेरुरचे गिरीश महाजन म्हणाले, येथील सरासरी आयुर्मान 80 ते 90 : ज्येष्ठांचे प्रमाण जास्त!
प्रमोद ठाकुर / कुडाळ:
ज्येष्ठांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर असल्यामुळे आई-वडिलांची काळजी घ्या, अशा गाईडलाईन्स ईस्ट ऑफ लंडन प्रशासनाने जनतेला दिल्या आहेत. त्याप्रमाणे आता काळजी घेतली जात आहे. वाहनांचा वापर खूप कमी प्रमाणात केला जात आहे. दोन क्यक्तींमध्ये किमान दोन मिटरचे अंतर ठेवण्याच्या सूचनांचे पालन होत असल्याने सुरुवातीपेक्षा आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणाखाली येत असल्याचे लंडनमधील ईस्ट ऑफ लंडनमध्ये राहणारे व ‘ब्रिटीश टेलिकॉम’ कंपनीत आयटी आर्किटेक्ट म्हणून कार्यरत असलेले मूळ कुडाळ तालुक्यातील नेऊऱ-देऊळवाडा येथील गिरीश तुळशीदास महाजन व सौ. इशा महाजन यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
महाजन हे लंडनमध्ये पत्नी सौ. इशा महाजन (मूळ रा. पाट येथील माला मुरारी प्रभूपाटकर) व मुलगा जय असे तिघे राहतात. इशा या एका शैक्षणिक संस्थेत असिस्टंट स्टाफ म्हणून कार्यरत आहेत, तर मुलगा सहावीत शिकत आहे. महाजन कुटुंबीय मूळ देवगड-मुणगे येथील. ते नेरुरमध्ये स्थायिक झाले.
लॉकडाऊन उशिरा सुरू झाल्याने धोका
लंडनमध्ये उशिराने लॉकडाऊन सुरू करण्यात आले. कोरोना सर्वत्र पसरला की नंतर तो आपोआपच कमी होईल, असे सांगितले गेल्याने सुरुवातीला फारशी काळजी घेतली नाही. त्यामुळे कोरोना पसरला व नियंत्रणाबाहेर गेला, असे महाजन म्हणाले. महाजन राहत असलेल्या इस्ट लंडन भागात लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार फारसा झालेला नाही. तेथील परिस्थिती चांगली आहे. वाहनांचा वापर खूपच कमी केला जातो. सर्व वाहने घरासमोरच उभी असतात. त्यामुळे दोन मीटर अंतराचा नियम चांगल्या पद्धतीने पाळला जातो, असे ते म्हणाले.
भारतातील अनेकजण करतात काम
आपल्यासोबत भारतातील अनेक तरुण लंडनमध्ये काम करतात. यातील बहुतेक ‘वर्क फ्रॉम होम’ करतात. काम करताना आमच्यामध्ये आपापल्या देशातील स्थितीबाबत नेहमीच चर्चा होते. मोबाईल, इंटरनेट, व्हीडिओ कॉलचा वापर करून कामे केली जात आहेत. ज्यांना ऑफिसमध्ये जाऊन काम करायला हवे ते ऑफिसला जातात. मात्र, नियमांचे पालन मात्र करावे लागते, असे महाजन म्हणाले. थोडक्यात अती महत्वाचे काम असेल, तरच बाहेर पडा, अशा सूचना असल्याने घरी राहूनच काम करण्याला आम्ही प्राधान्य देतो, असे त्यांनी सांगितले.
भारताचे चांगले नियंत्रण
भारतात खूप लोकसंख्या आहे. अशातच मुंबई-पुण्यासारख्या शहरात दाटीवाटीने लोक राहतात. त्या मानाने चांगल्या पद्धतीने लॉकडाऊन करून कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणला, अशी आम्हा लंडनमध्ये काम करणाऱया भारतीयांची धारणा आहे, असे ते म्हणाले. काही लोकांना अन्न मिळत नाही, अशा पोस्ट व्हॉट्सऍपवर येतात, याबाबत त्यांनी खंत व्यक्त करून लोकांना खरेच अन्नधान्य मिळाले नसते, तर लोक रस्त्यावर आले असते. ज्याअर्थी लोक रस्त्यावर येत नाहीत, त्याअर्थी सरकार, प्रशासन व जनतेने एकमेकांना चांगली साथ दिली आहे, असेच म्हणावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अनेक भारतीय लंडनमध्ये अडकून
भारतातून एक-दोन वर्षांच्या काळासाठी लंडनमध्ये आलेल्या अनेकांना एप्रिल-मे जूनमध्ये पुन्हा भारतात परतायचे होते. मात्र, कोरोनामुळे विमानसेवा बंद केल्याने या भारतीयांना त्यांच्या नियोजित वेळेत भारतात परतता येत नाही. ते सध्या लंडनमध्ये अडकून पडले आहेत. विशेष म्हणजे लंडन सरकारने त्यांच्या राहण्याचा काळ वाढवून दिला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरील संकट दूर झाल्याचे ते म्हणाले.
ज्येष्ठांसाठी ‘केअरिंग होम’
लंडनमध्ये 80 ते 85 वयोगटातील लोकांची संख्या खूप आहे. सरासरी आयुर्मान 80 ते 90 वर्षांचे आहे. तसेच ज्येष्ठांची स्वतंत्र राहण्याची पद्धत येथे आहे. त्यामुळे सुरुवातीला जी मृतांची संख्या वाढली, ती ज्येष्ठांचीच. एकूण मृतांपैकी 80 वर्षांवरील पन्नास टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे, असे ते म्हणाले.
व्यायामाला महत्व
लंडनमध्ये व्यायामाला महत्व दिले असून तुम्ही घरी व्यायाम करा, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. व्यायाम करून आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असा संदेश दिला जात आहे. त्याप्रमाणे आम्हीही रोज न चुकता व्यायाम करतो, असे सौ. इशा म्हणाल्या.









