प्रतिनिधी /बेळगाव
मूळचे धामणे व खानापूर रोड, टिळकवाडी येथील रहिवासी ज्येष्ट वैज्ञानिक अरुण जायण्णावर (वय 65) यांचे 22 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
22 जुलै 1956 रोजी अरुण जायण्णावर यांचा जन्म झाला. 1976 मध्ये त्यांनी जीएसएस कॉलेजमधून बीएस्सीची पदवी घेतली. कर्नाटक विद्यापीठातून त्यांनी एमएस्सी पदवी घेतली. त्यानंतर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स येथे एस. एस. भटनागर पुरस्कार प्राप्त नरेंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी मिळविली. त्यानंतर ते पुढील उच्चशिक्षणासाठी इटलीला गेले. तेथे इंटरनॅशनल सेंटर फॉर थियॉरॉटिकल फिजिक्स या विषयावर अतिथी वैज्ञानिक म्हणून त्यांनी काम केले. युनिव्हर्सिटी ऑफ उल्म येथे काहीकाळ काम करून ते 1991 मध्ये भारतात परतले.
यानंतर भुवनेश्वर येथील इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स येथे ते रुजू झाले. याचबरोबर होमिभाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट मुंबई येथेही त्यांनी काम केले. इंटरनॅशनल सेंटर फॉर थियॉरॉटिकल फिजिक्स या संस्थेने 1996 मध्ये त्यांना सॉलिड स्टेट फिजिक्स यातील संशोधनासाठी आयसीटीपी पुरस्काराने गौरविले तर इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसने त्यांची फेलो म्हणून निवड केली. कौन्सिल ऑफ सायंटिफिक ऍण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च संस्थेने त्यांना शांतीसागर भटनागर पुरस्कार प्रदान केला. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी ऍण्ड नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसने त्यांची फेलो म्हणून निवड केली. विज्ञानातील संशोधनासाठी 2004 मध्ये त्यांना जी. डी. बिर्ला पुरस्कार देण्यात आला होता.
त्यांच्या निधनाने बेळगावने एक नामांकित व अभ्यासू वैज्ञानिक गमावला आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.









