105 स्टोअर्स बंद, निवडक स्टोअर्सची नव्याने उभारणी करणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
डॉमिनोज पिझ्झा आणि डंकिन डोनट्स यासारख्या फास्ट फूड विक्रीत नाव कमावणाऱया ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडने (जेएफएल) सप्टेंबर तिमाहीत जवळपास 105 स्टोअर्स बंद केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या अगोदर कंपनीने जून तिमाहीत 100 स्टोअर्स बंद केली होती. यासह दुसऱया तिमाहीत कंपनीचा नफा वधारुन 77 कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याची माहिती आहे.
स्टोअर्स बंद झाल्यानंतर देशातील ज्युबिलंट फूडच्या स्टोअर्सची संख्या आता घटून 1,264 वर राहिली आहे. कंपनीने डॉमिनोज पिझ्झाची 10 नवीन स्टोअर्सही सुरु केली आहेत. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार नवीन शहरांमध्येही कंपनीने स्टोअर्सच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. परंतु आता कंपनीने नवीन योजना आखली असून देशातील 281 शहरांचा आराखडा तयार केला असल्याचे स्पष्ट केले आहे.
कंपनीने यावेळी अन्य बाजू सांगताना म्हटले आहे, की दुसऱया तिमाहीत डंकिन डोनट्सची पाच रेस्टॉरंटही बंद केली आहेत. तसेच एका नवीन स्टोअरचा प्रारंभही केला आहे. या बदलासह कंपनीच्या स्टोअर्सची संख्या 30 पेक्षाही कमी होऊन 26 वर स्थिरावली असून कोविडच्या प्रभावाने रेस्टॉरंटच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने विक्रीच्या आकडेवारीत घसरण नोंदवण्यात आली आहे. कोरोनाचे वातावरण शमल्यानंतर व्यवसाय वृद्धी होईल अशी कंपनीला आशा आहे.
नफा कमाईत मात्र तेजी
ज्युबिलंट फूडची दुसऱया तिमाहीत नफा कमाई ही 73.4 कोटी रुपयांनी वधारुन 76.9 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. याचदरम्यान कंपनीचे उत्पन्नही 998.05 कोटी रुपयांवरुन 18.2 टक्क्यांनी घटून 816.33 कोटी रुपयांवर स्थिरावले आहे.
भारताबाहेरही स्टोअर्स
ज्युबिलंट फूडची स्टोअर्स देशासोबत देशाच्या बाहेरही आहेत. यामध्ये श्रीलंकेत 22 स्टोअर्स आणि बांगलादेशात 4 स्टोअर्स कार्यरत असल्याचे सांगितले आहे. सदर देशांमध्ये दुसऱया तिमाहीतही आपला व्यवसाय सलगपणे चालू ठेवल्याचेही नमूद केले आहे.









