ऑनलाईन टीम / मुंबई :
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका करत म्हटले की, सत्तेत पुन्हा येण्यासाठी आम्ही कोणताही प्रयत्न करणार नाही. मात्र, हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण कोणावर नाराज आहे, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ, असेही फडणवीस म्हणाले.
विधिमंडळाचे अधिवेश ठरवण्याबाबतच्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहिले होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्यासंदर्भातील वक्तव्य केले आहे.
ते म्हणाले, सत्तेत येण्यासाठी आम्ही काहीही करणार नाही. देशाच्या 70 ते 72 वर्षांच्या कालखंडात अशा प्रकारची सरकारे चाललेली आपण पाहिलेले नाही. मात्र, हे सरकार आम्ही पाडणार नाही, तर हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल. जो पर्यंच आम्ही विरोधी पक्षात आहोत, तो पर्यंत आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी चोखपणे पार पाडणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
- … मात्र जनतेला भरडू नका
महाविकास आघाडी सरकारच्या तीन घटकपक्षांमध्ये सुसंवाद दिसत नाही. त्यांच्यात विसंवादच आहे. त्यांचा आता एकमेकांवर विश्वासही राहिलेला नाही, असे सांगतानाच, तुमच्या भानगडींमध्ये राज्यातील जनतेला का भरडता आहात ? असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला किंवा एकमेकांच्या गळात गळे घाला, मात्र तुम्ही जनतेला भरडू नका, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.








