प्रतिनिधी / सांगली
कोरोनाच्या संकट काळामध्ये 50 टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक करण्याचे राज्य शासनाचे नियम असताना या नियमांचे उल्लंघन करत 59 प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या आटपाडी आगाराच्या आटपाडी-सांगली या एसटीच्या चालक-वाहकावर सांगली पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली.
मंगळवारी सकाळी साडेबारा ते एकच्या दरम्यान आटपाडी आगाराची एसटी बस खचाखच भरल्याचे माधवनगर जकात नाक्याजवळील काही लोकांनी पाहिले. नागरिकांनी हा प्रकार तेथे नाकाबंदीस असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. पोलिस व काही लोकांनी एसटी बसचा जकात नाक्यापासून पाठलाग करत ही बस साखर कारखान्यासमोर थांबवण्यात आली. त्यावेळी अनेक लोक ड्रायव्हर जवळही बसल्याचे दिसून आले. गाडीमध्ये नियमापेक्षा जास्त प्रवासी घेतल्याने चालक वाहक या दोघांच्यावर पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली.
दरम्यान याबाबत काही प्रवाशांनी बसेसची संख्या कमी असल्याने लोकांना असा दाटीवाटीने प्रवास करावा लागत असल्याचे सांगितले. एसटीच्या सांगली विभागाने बसेसची संख्या वाढवावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.