प्रतिनिधी / सांगली
ज्यांनी शेतकऱ्यांची बिले बुडविली. सहकारी साखर कारखाना प्रायव्हेट केला अशी मंडळी आता पदवीधरच्या निवडणूकीत उतरून जनतेला उपदेशाचे डोस पाजत आहेत. ही मंडळी पदवीधरांचे काय प्रश्न सोडवणार असा सवाल पालकमंत्री जयंत पाटील यांनी केला.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार अरूणआण्णा लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ सांगलीत डेक्कन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार मोहनशेठ कदम, अनिल बाबर, विक्रम सावंत, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, विशाल पाटील, जयश्री पाटील, यांच्यासह जिल्हÎातील काँग्रेस, राष्टवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, विरोधी पक्ष असणारे भाजपाचे नेते अफवा पसरवण्यात आघाडीवर आहेत. तो त्यांचा आवडीचा छंद आहे. या मतदारसंघाचे पूर्वीचे आमदार असणाऱया चंद्रकांतदादा पाटील यांनी सहा वर्षात पदवीधरांचे किती प्रश्न सोडविले ते सांगावे तसेच केंद्र सरकारने गेल्या सहा वर्षात बेरोजगारीचा प्रश्न कितपत सोडविला ते ही जाहिरपणे सांगावे असे आवाहन केले. विरोधकांच्याकडे सध्याच्या परिस्थितीत कोणताही मुद्दा नसल्याने ते जनतेचा बुध्दिभेद करत आहेत. तसेच काहीतरी वावड्या उठवत आहेत.
पण तसे काहीही नाही. पुणे मतदारसंघातील सर्व जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येवुन या निवडणूकीचा प्रचार वेगाने सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. कोणीही या निवडणुकीत गाफिल न राहता त्यांनी या निवडणुकीत लाड आणि आसगावकर यांना विक्रमी मताधिक्यांनी निवडून आणावे असे आवाहन केले. स्वागत पृथ्वीराज पाटील यांनी केले. तर आभार संजय बजाज यांनी मानले.








