लग्नासाठी मुलीचं वय २१ वर्षे केल्याने अबू आझमींची मोदींवर टीका
प्रतिनिधी/ मुंबई
मुलींच्या लग्नाचे किमान वय 18 वर्षांवरून 21 वर्ष करण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळाने सकारात्मकता दर्शवली आहे. या हिवाळी अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक संसदेत मांडले जाण्याची शक्मयता आहे. विवाहाचे वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक संसदेत मांडण्यासाठी मंजुरी देण्यात आले. यावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मोदींवर टीका केली आहे.
दरम्यान, महिलांसाठी विवाहाचे कायदेशीर वय १८ वर्षांवरून २१ वर्षे, म्हणजे पुरुषांइतकेच करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत विवाहासाठी महिलांचे कायदेशीर वय १८ वर्षे, तर पुरुषांचे २१ वर्षे होते. महिलांच्या विवाहासाठी किमान वय किती असावे याबाबत सरकार विचार करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर वर्षभराने सरकारने हा निर्णय घेतला. दरम्यान या निर्णयावरुन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केलेल्या टीकेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अबू आझमी यांनी ज्यांना मुलं नाहीत त्यांनी हा कायदा आणला आहे सांगत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. यासाठी ज्यांना मुलं आहेत त्यांचं मत घ्यायला हवं होतं असंही ते म्हणाले. तसंच कोणताही नियम करण्याची गरज नाही, आपल्या मुलाचं, मुलीचं लग्न कधी लावायचं हे त्या कुटुंबावर सोडून दिलं पाहिजे असंही यावेळी त्यांनी म्हटलं.