ऑनलाईन टीम / पुणे :
समाज, धर्म व राष्ट्राची सांस्कृतिक पातळी ही त्या भागातील स्त्रियांच्या स्थानावर अवलंबून असते. ज्या समाजात स्त्री ला स्थान व मान असेल, त्यानुसार तेथील सांस्कृतिक पातळी ठरते. स्त्री शक्ती हे बल असून तिचा गौरव ही अभिव्यक्ती आहे. ज्यांनी अशी अभिव्यक्ती घडविली, त्या स्त्रियांचा सन्मान व्हायला हवा. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री शक्तीला मोठे स्थान असून ज्ञान, शरीर व संपत्ती ही तिन्ही बले एकवटतात, ती स्त्री शक्ती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून भरारी घेणा-या महिलांचे कार्य समाजासमोर यावे, या उद्देशाने सुरु केलेल्या स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कला, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील महिलांचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला. ज्येष्ठ कथक नृत्यांगना पं.मनिषा साठे, शिक्षणक्षेत्रात डॉ.विद्या येरवडेकर, वैद्यकीय क्षेत्रात डॉ.जयश्री तोडकर, उद्योजिका झेलम चौबळ यांना यावर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फळांची परडी, शाल, सन्मानचिन्ह, पैठणी साडी, हलव्याचा हार असे सन्मानाचे स्वरूप होते.
पं.मनिषा साठे म्हणाल्या, स्त्रियांनी सकारात्मक उर्जा ठेवणे गरजेचे आहे. आपण जेवढे मन स्वच्छ ठेवू, तेवढे रोजच्या जीवनात आनंदी राहू. तरच तो आनंद इतरांना देऊ शकू. जे जे चांगले दिसेल, ते आत्मसात करायचे, हे प्रत्येक स्त्रीने ठरवायला हवे. डॉ.जयश्री तोडकर म्हणाल्या, पालकांनी मुले किंवा मुली असा भेदभाव करु नये. मुलगा किंवा मुलगी दोघांनाही समान वागणूक मिळायला हवी. आज सर्व क्षेत्रात महिला पुढे आहेत. त्यामुळे कितीही संकटे आली, तरी मुलींना कणखर बनवा.