पन्नास-साठ वर्षांपूर्वी ‘ज्ञानसागरातील शिंपले’ नावाचे एक पुस्तक अनेक घरात असे. सामान्य ज्ञानात भर टाकणाऱया छोटय़ा छोटय़ा माहितींचे त्यात छान संकलन होते.
पण पुढे ज्ञानसागरातील (भंपक) शिंपले वेचून आमच्या डोसक्मयावर आदळण्याचा लोकांनी चंगच बांधला. वेगवेगळय़ा मासिकात, डायजेस्ट नियतकालिकात ‘तुम्हाला हे ठाऊक आहे का?’, ‘ऐकावं ते नवलच’ वगैरे शीर्षकांखाली वाट्टेल ती माहिती दिली जाऊ लागली. मुंगी पूर्वेला चालत निघाली तर पृथ्वीला वळसा मारून पुन्हा पूर्वस्थितीत यायला तिला किती वेळ लागेल? विषुववृत्ताभोवती अखंड दोरी गुंडाळली तर त्या दोरीची लांबी किती भरेल? सगळय़ा समुद्रात मिळून किती थेंब पाणी असेल? पृथ्वीवरून किती किलोमीटर उंचीची शिडी लावली तर त्या शिडीवरून चढून आपण चंद्रावर पोचू? वगैरे वगैरे. शेवटी एकदाचे सरले ते बालपण. राहिल्या त्या गमतीदार आठवणी.
नंतर पुढच्या पिढीला ज्ञानसागरातील असले शिंपले वेचून देण्याचे काम व्हॉट्सअपवाले करू लागले. विवेकानंद, वपु, पुल, विश्वास नांगरे पाटील, नाना पाटेकर वगैरे विभूतींनी न बोललेली, न लिहिलेली वाक्मये-सुभाषिते बिनदिक्कतपणे त्यांच्या नावाने व्हॉट्सअपवर अवतरली. लोक त्यांची शहानिशा न करता ती सुभाषिते फॉरवर्ड करू लागले!
या ज्ञानसागरात स्नान करण्यापासून फार थोडे लोक वंचित राहिले होते. ज्यांना संगणक किंवा स्मार्ट फोन वापरता येत नाही किंवा परवडत नाही असे बिचारे ज्ये÷ नागरिक टीव्हीवरच्या कौटुंबिक मालिका बघून मनोरंजनाचा आनंद लुटत होते. त्यांना देखील वृत्तवाहिन्यांनी आणि कौटुंबिक मालिकांनी ज्ञानवाटपाचा वसा घेतला. अपरात्री वृत्तवाहिन्या विविध ज्योतिष्यांची भाकिते आणि बुवांचे उपदेश प्रसारित करतात. क्वचित हे ज्योतिषी-बुवा लैंगिक अपराधांपायी तुरुंगात जातात. मग टीव्हीवाले नवे ज्योतिषी-बुवा हुडकून काढतात. ज्ञानसागर आटला नाय पायजेल!
परवा एका कौटुंबिक मालिकेने ज्ञानसागरातले दोन मौल्यवान शिंपले दिले. दडपे पोहे करताना लसणाची फोडणी देतात! ऐकूनच छाती दडपली! आता श्रीखंड केल्यावर त्यात दाण्यांचे कूट घालून वर ओलं खोबरं-कोथिंबीर पेरण्याचा सल्ला मिळण्याची वाट बघतोय! दुसरा शिंपला म्हणजे पायातल्या अंगठय़ाजवळच्या बोटात जोडवी घातली की रक्तदाब आपोआप नियंत्रित होतो! हे वरदान फक्त सवाष्णींना आहे की आबालवृद्ध स्त्रीपुरुषांना आहे, हे मात्र कळले नाही. ते लवकरच कळेल अशी आशा आहे.








