प्रतिनिधी/ बेळगाव
ज्ञान प्रबोधन मंदिर या आयसीएमई शाळेत 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते म. गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्या मंजिरी रानडे व अविनाश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सर्वांनी ध्वजप्रणाम करून राष्ट्रगीत व झेंडागीत म्हटले.
आदिती बालिगा यांनी जीवनात सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आपले मन शक्तीशाली असले पाहिजे. निसर्ग हा सगळ्यात मोठा डाक्@टर आहे. स्वत:ची व तब्येतीची काळजी घ्या. वेळेचा सदुपयोग करा. सतत कष्ट व प्रयत्न केल्यास यश मिळते. मोबाईलचा योग्य वापर करा. लक्ष्य साधण्यासाठी मन व शरीर शक्तीशाली असणे आवश्यक आहे. त्यासाठी रोज व्यायाम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
याप्रसंगी शाळेचे विद्यार्थी व एनसीसी बॅचेने बहारदार पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी व्यायाम डबल्स, लेझीम, सूर्यनमस्कार यांचे सुंदर प्रात्यक्षिकीकरण करण्यात आले. याला शिक्षक अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या प्राचार्या मंजिरी रानडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. गाथा जैन हिने पाहुण्यांची ओळख करून दिली. चंद्रज्योती यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर सामूहिक गीत सादर करण्यात आले. शिक्षिका पुष्पा यांनीही मार्गदर्शन केले.
सान्वी सतीश व श्रावणी पाटील यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन खुशी श्रेयकर हिने केले. नैनिका भोजवाणी हिने आभार मानले. याप्रसंगी शाळेचे संचालक अनिल चौधरी, नितीन कपिलेश्वरकर, प्रशासक डॉ. गोविंद वेलींग, पालक, विद्यार्थी, शिक्षक आदी उपस्थित होते.









