55 धावांनी विजयासह राजस्थान रॉयल्सची पाचव्या स्थानी झेप,
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जोस बटलरने (64 चेंडूत 11 चौकार, 8 षटकारांसह 124) पहिलेवहिले तडाखेबंद आयपीएल शतक झळकावल्यानंतर राजस्थान रॉयल्सने आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा 55 धावांनी धुव्वा उडवत आणखी एक धमाकेदार विजय साकारला. प्रारंभी बटलर व कर्णधार संजू सॅमसन (33 चेंडूत 48) यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने 3 बाद 220 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात कर्णधार बदलूनही हैदराबादच्या पदरी निराशाच आली. त्यांना निर्धारित 20 षटकात 8 बाद 165 धावांवरच समाधान मानावे लागले.
या विजयासह राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत दिवसभरातील पहिल्या लढतीनंतर पाचव्या स्थानी पोहोचला होता. राजस्थानतर्फे ख्रिस मॉरिस (3-29), मुस्तफिजूर रहमान (3-20) यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. कार्तिक त्यागी (1-32), राहुल तेवातिया (1-45) यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला.
विजयासाठी 221 धावांचे आव्हान असताना हैदराबादने पॉवर प्लेच्या पहिल्या 6 षटकात बिनबाद 57 धावांसह उत्तम सुरुवात केली होती. या मोसमातील केवळ दुसरा विजय संपादन करण्यात ते यशस्वी ठरणार का, याची उत्सुकता होती. मात्र, मुस्तफिजूरने मनीष पांडेचा (31) अडथळा दूर सारला आणि त्यानंतर धोकादायक जॉनी बेयरस्टो (30) व विजय शंकर (8) देखील बाद झाले.
कर्णधार केन विल्यम्सन मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात (20) डीप मिडविकेटवरील मॉरिसकडे झेल देत परतला. मोहम्मद नबीने (5 चेंडूत 17) आव्हानात जान भरण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचे प्रयत्न खूपच तोकडे पडणारे होते. शेवटच्या 5 षटकात 91 धावांची आवश्यकता असताना हैदराबादचे मधल्या व तळाच्या फळीतील फलंदाजांकडून फारशी अपेक्षाच नव्हती.
जोस बटलरची शतकी डरकाळी
प्रारंभी, बटलरने फॉर्ममध्ये परतत शतकी डरकाळी फोडल्यानंतर राजस्थानने 3 बाद 220 धावांचा डोंगर रचला. बटलर (124) व कर्णधार संजू सॅमसनची दुसऱया गडय़ासाठी 150 धावांची भागीदारी विशेष महत्त्वपूर्ण ठरली. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (12) मात्र स्वस्तात बाद झाला होता. इंग्लिशमन बटलरने 11 चौकार व 8 षटकार फटकावले तर सॅमसनने 4 चौकार व 2 षटकार खेचले. सनरायजर्सतर्फे रशीद खान (1-24), विजय शंकर (1-42) व संदीप शर्मा (1-50) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर राजस्थानला पहिल्या 2 षटकात केवळ 5 धावा जमवता आल्या. नव्याने वर्णी लागलेला कर्णधार विल्यम्सनने स्टार गोलंदाज रशीदला तिसऱयाच षटकात गोलंदाजीला आणले आणि त्याने जैस्वालला पायचीत करत पहिले यश मिळवून दिले. जैस्वालने 3 चौकार फटकावत उत्तम सुरुवात केली. पण, नंतर रशीदने त्याला बाद करत आपला क्लास दाखवून दिला.
राजस्थानचा कर्णधार सॅमसनला 10 व्या षटकात मनीष पांडेने जीवदान दिले. सॅमसन त्यावेळी 23 धावांवर खेळत होता. नंतर खलील अहमदला उत्तुंग षटकार खेचत त्याने आपल्या फॉर्मची प्रचिती आणून दिली. दुसरीकडे, बटलर मात्र उत्तम बहरात होता आणि त्याने भुवनेश्वरला 2 चौकार फटकावत आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले.
रशीदची 4 षटके व्यवस्थित खेळून काढल्यानंतर बटलर व सॅमसन यांनी 13 व्या षटकात 17 धावा वसूल केल्या. त्यानंतर जवळपास सर्वच गोलंदाज महागडे ठरु लागल्यानंतर विल्यम्सनने नबीकडे चेंडू सोपवला. पण, बटलरने त्याचाही समाचार घेताना 2 षटकार व 2 चौकार वसूल केले. विजय शंकरने 17 व्या षटकात सॅमसनला बाद करण्यात यश मिळवले. बटलरला रोखणे मात्र कोणत्याच गोलंदाजाला शक्य होत नव्हते. अखेर 19 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर संदीप शर्माने बटलरचा त्रिफळा उडवत त्याच्या खेळीला पूर्णविराम दिला. सनरायजर्सचे खराब क्षेत्ररक्षण येथे राजस्थानच्या पथ्यावर पडले. हैदराबादचे क्षेत्ररक्षक चोरटय़ा धावा रोखण्यात अपयशी ठरले. शिवाय, त्यांनी अनेक झेलही सांडले.
धावफलक
राजस्थान रॉयल्स ः जोस बटलर त्रि. गो. संदीप शर्मा 124 (64 चेंडूत 11 चौकार, 8 षटकार), यशस्वी जैस्वाल पायचीत गो. रशीद खान 12 (13 चेंडूत 2 चौकार), संजू सॅमसन झे. अब्दुल समद, गो. शंकर 48 (33 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), रियान पराग नाबाद 15 (8 चेंडूत 1 षटकार), डेव्हिड मिलर नाबाद 7 (3 चेंडूत 1 षटकार). अवांतर 14. एकूण 20 षटकात 3 बाद 220.
गडी बाद होण्याचा क्रम
1-17 (यशस्वी, 2.6), 2-167 (संजू सॅमसन, 16.4), 3-209 (बटलर, 18.6).
गोलंदाजी
भुवनेश्वर कुमार 4-0-37-0, संदीप शर्मा 4-0-50-1, रशीद खान 4-0-24-1, खलील अहमद 4-0-41-0, विजय शंकर 3-0-42-1, मोहम्मद नबी 1-0-21-0.
सनरायजर्स हैदराबाद ः मनीष पांडे त्रि. गो. मुस्तफिजूर 31 (20 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), जॉनी बेअरस्टो झे. अनूज रावत, गो. तेवातिया 30 (21 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), केन विल्यम्सन झे. मॉरिस, गो. कार्तिक त्यागी 20 (21 चेंडूत 1 चौकार), विजय शंकर झे. मिलर, गो. मॉरिस 8 (8 चेंडूत 1 चौकार), केदार जाधव त्रि. गो. मॉरिस 8 (8 चेंडूत 1 षटकार), मोहम्मद नबी झे. अनुज रावत, गो. मुस्तफिजूर 17 (5 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), अब्दुल समद झे. रावत, गो. मॉरिस 10 (8 चेंडूत 1 षटकार), रशीद खान झे. मॉरिस, गो. मुस्तफिजूर 0 (2 चेंडू), भुवनेश्वर नाबाद 14 (10 चेंडूत 2 चौकार), संदीप शर्मा नाबाद 8 (6 चेंडूत 1 चौकार). अवांतर 8. एकूण 20 षटकात 8 बाद 165.
गडी बाद होण्याचा क्रम
1-57 (मनीष पांडे, 6.1), 2-70 (बेअरस्टो, 7.6), 3-85 (विजय शंकर, 10.4), 4-105 (विल्यम्सन, 12.5), 5-127 (नबी, 14.2), 6-142 (समद, 16.3), 7-142 (केदार, 16.6), 8-143 (17.2).
गोलंदाजी
कार्तिक त्यागी 4-0-32-1, मुस्तफिजूर 4-0-20-3, चेतन साकरिया 4-0-38-0, ख्रिस मॉरिस 4-0-29-3, राहुल तेवातिया 4-0-45-1.
बॉक्स
कर्णधार बदलूनही हैदराबादच्या पदरी पुन्हा निराशाच
सनरायजर्स हैदराबादने या मोसमात डेव्हिड वॉर्नरच्या अपयशी कामगिरीमुळे त्याची नेतृत्वावरुन तडकाफडकी उचलबांगडी केली व त्याच्याजागी केन विल्यम्सनची कर्णधारपदी नियुक्ती केली. मात्र, रविवारी केन विल्यम्सनच्या नव्या नेतृत्वाखाली देखील हैदराबादची अपयशी कामगिरीची परंपरा कायम राहिली. हैदराबादचा या मोसमात हा 7 सामन्यातील चक्क 6 वा पराभव असून गुणतालिकेत ते अर्थातच शेवटच्या स्थानी फेकले गेले आहेत.









