वृत्तसंस्था / कैरो
भारताची आघाडीची महिला स्क्वॅशपटू जोश्ना चिन्नप्पाने सहा महिन्यानंतर पहिल्याच स्पर्धेत खेळताना सीआयबी इजिप्शियन ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे.
जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानावर असणाऱया जोश्नाला तिसऱया फेरीतील लढतीत स्थानिक खेळाडू इरिदा मोहमदने विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. इरिदाने पहिले दोन गेम गमविले असले तरी तिने झुंजार प्रदर्शन करीत नंतरचे दोन गेम्स जिंकून जोश्नाशी बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये जोश्नाने तिचा कडवा प्रतिकार मोडून काढत 11-7, 11-6, 7-11, 10-12, 11-9 असा विजय मिळवित आगेकूच केली. तिची पुढील लढत जागतिक द्वितीय मानांकित नूर अल शेरबिनीशी होणार आहे. ‘ती वार्मअप होण्यासाठी थोडा वेळ घेते, पण एकदा तिला लय सापडली की तिला रोखणे कठीण जाते. तिने काही रॅलीजवर गुण मिळविलेले आहेत. पण काही वेळा मी तिच्याकडून पराभूत झाले आहे,’ असे जोश्नाने म्हटल्याचे स्पर्धेच्या वेबसाईटवर देण्यात आले आहे.
भारताचा सर्वोच्च मानांकन असलेला पुरुष खेळाडू सौरव घोषालला मात्र तिसऱया फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला इजिप्तच्या मेझन हशेमने 11-8, 11-9, 11-8 असे हरविले. मार्चनंतर घोषालची देखील ही पहिलीच स्पर्धा आहे. मार्चमध्ये देशात कोव्हिड 19 महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर केले होते आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घालण्यात आल्याने कोणतीही स्पर्धा होऊ शकली नव्हती.









