साडेतीन लाखांचा ऐवज लंपास, लॉकडाऊन काळातही चोऱयांचे सत्र सुरूच
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनच्या काळातही चोऱयांचे सत्र सुरूच आहे. कुमारस्वामी ले-आऊटमधील एका अभियंत्याच्या घरातील चोरीची घटना ताजी असतानाच जोशी मळा, खासबाग येथे साडेतीन लाखांची घरफोडी झाली आहे. रविवारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी 7 तोळे सोन्याचे दागिने, 10 तोळे चांदी पळविली आहे. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटही फोडण्यात आले आहे. यासंबंधी चन्नबसाप्पा तम्माण्णाप्पा उदनूर यांनी रविवारी सायंकाळी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
किमती दागिने लंपास
चन्नबसाप्पा, त्यांची पत्नी व दोन मुले शुक्रवार दि. 28 मे रोजी गुळेदगुड्डला गेले होते. त्यावेळी चोरटय़ांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील किमती दागिने पळविले आहेत. सुमारे साडेतीन लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. शेजाऱयांकडून या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चन्नबसाप्पा व त्यांचे कुटुंबीय बेळगावात दाखल झाले.शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. सध्या कोरोना महामारी थोपविण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात चोरटे मात्र सक्रिय आहेत. संपूर्ण पोलीस यंत्रणा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यावर आहे. या परिस्थितीचा फायदा घेत चोरटे सक्रिय झाले आहेत.









