लोकांमध्ये घबराट ः पुनर्वसनाचे काम युद्धपातळीवर सुरू
जोशीमठ / वृत्तसंस्था
उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये 15 दिवसांनंतर पुन्हा एकदा नवीन भेगा दिसू लागल्याने लोक घाबरले आहेत. पाच घरांमध्ये या भेगा पडल्या आहेत. चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी हिमांशू खुराणा यांनी परिसरात पोहोचल्यानंतर घरांची पाहणी केली. क्रॅक मीटर बसवण्यात आलेल्या घरांमध्ये भेगांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
नवीन भेगा समोर आल्यानंतर मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी जोशीमठ संदर्भात सचिवालयात तातडीची बैठक बोलावून आढावा घेतला. या बैठकीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकाऱयांसह जोशीमठमधील भूस्खलनानंतर पुनर्वसन आणि बचावकार्यात गुंतलेल्या सर्व तज्ञांना बोलविण्यात आले होते.
आतापर्यंत 868 इमारतींना तडे
उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये जमीन खचल्याने आतापर्यंत 868 इमारतींना तडे गेले असल्याचे चमोलीचे जिल्हाधिकारी हिमांशू खुराणा यांनी शुक्रवारी सांगितले. यातील 181 इमारती असुरक्षित भागात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 243 आपत्तीग्रस्त कुटुंबातील 878 सदस्य मदत शिबिरात आहेत. त्यांना खाण्या-पिण्याची, औषधांची सोय केली जात आहे. या कुटुंबांना पुनर्वसन आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी 28 जानेवारी रोजी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तडे गेलेल्या इमारतींची संख्या 863 इतकी जाहीर केली होती.









