जोधपुरी काबुली हा राजस्थानी राजेशाही खाद्यपदार्थ आहे. व्हेज बिर्याणीप्रमाणेच असलेतरी त्याची चव वेगळीच लागते. तळलेल्या भाज्यांसोबत ग्रेव्ही व भाताचा थर याप्रमाणे लावून हा मोंगलाई पदार्थ बनवला जातो. हा विशेषतः हिवाळय़ात भाज्यांचे भरघोस प्रमाण असते त्या वेळी बनवला जातो.यासोबत कांदा टोमॅटो सॅलड किंवा पुदिना रायते दिले जाते. घरच्या घरी हा पदार्थ बनविणे कठीण असले तरी एखादा नवीन पदार्थ करून त्याची चव पाहण्यास काय हरकत आहे?
साहित्यः दीड वाटी लांब दाण्याचा बासमती तांदूळ, पाऊण वाटी दही, 2 मध्यम बटाटे, 1 गाजर, अर्धी वाटी फ्लॉवरचे तुरे, अर्धी वाटी मटारचे दाणे, 1 कांदा,1 टोमॅटो, 2 ते 3 हिरव्या मिर्च्या, 1 इंच आले, 2 ते 3 लवंगा, मूठभर कोथिंबीर, ब्रेडचे दोन स्लाईस, 10 ते 15 काजुगर, 5 ते 6 मिरीदाणे, 2 वेलदोडे, 2 लसूण पाकळय़ा, अर्धा इंच दालचिनी, 2 तमालपत्र, 1 काळा वेलदोडा, 1 चमचा जिरे, 1 चमचा शाहजिरे, अर्धा चमचा हळदपूड, 1 चमचा लाल मिरचीपूड,मीठ चवीप्रमाणे, 1 चमचा धने, पाव वाटी दूध, 8 केसर काडय़ा, अर्धी वाटी तूप
तयारी : तांदूळ स्वच्छ धुवून त्यात 3 वाटय़ा पाणी घालून दहा मिनिटे भिजत ठेवा. यानंतर हे तांदूळ पॅनमध्ये ओतून थोडं मीठ घालून अर्धवट कच्चा भात शिजवून घ्या.
ग्रेव्ही बनविण्यासाठी : वेलदोडा, मिरी, लवंगा, दालचिनी, हे सर्व एकत्र करून त्याची पावडर बनवून घ्या. कोमट दुधात केसर काडय़ा घाला. बटाटे व गाजर यांची साले काढून त्याच्या गोल चकत्या बनवून घ्या. फ्लॉवरचे तुरे काढून घ्या. 1 चमचाभर तूप गरम करून त्यात काजूगर सोनेरी रंगावर तळून घ्या. याच तुपावर (तेल चालेल) बटाटे, गाजर, फ्लॉवर हे स्वतंत्रपणे तळून घ्या. या भाज्या थोडय़ा कुरकुरीत कराव्यात. उरलेल्या तेलात ब्रेडचे तुकडेदेखील तळून घ्या.
ग्रेव्ही बनविण्याची कृती : पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, शाहजिरे, तमालपत्र, वेलची, घालून परतून घ्या. जिरे तडतडल्यानंतर त्यात कांदा रंग बदलेपर्यंत परता. हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट घाला. यात मीठ व हळद, लाल मिरचीपूड, धने पूड घालून परता. फेटलेले दही यामध्ये ओतून मध्यम आचेवर ढवळून घ्या. दहय़ाला उकळी फुटल्यावर त्यात तळलेला बटाटा, गाजर, फ्लॉवर, मटारचे दाणे घालून परता. यावर तयार केलेला मसाला घालून झाकण ठेवा. पाच मिनिटे ठेवल्यावर वाफ येईल.
जाडबुडाच्या उभट भांडय़ात शिजवून घेतलेला (निम्मा) भाताचा एक थर घाला. यावर ग्रेव्हीपैकी निम्मी भाजी घालून पुन्हा वर भाताचा थर घाला. उरलेली ग्रेव्ही वर ओता. यावर ब्रेड व काजूगर घाला. यावर सॅलड किंवा टोमॅटो व कांद्याच्या चकत्या, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा. मध्यभागी (भोक) एक खोलगट जागा करून त्यात केसर मिश्रीत दूध ओता. हे पॅन ऍल्युमिनियम फॉईलने पूर्णपणे झाकून 15 मिनिटे मंदगॅसवर ठेवा. रायत्यासोबत जोधपुरी काबुली खाण्यास द्या.









