चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर तयारी : मंदिर परिसराची केली स्वच्छता
वार्ताहर /जोतिबा डोंगर.
दख्खनचा राजा श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा मंदिरात पाकाळणी विधी करून मंदिर स्वच्छ करण्यात आले. यावेळी मंदिराचे शिखरे, दीपमाळ, ओवऱया, दागदागिने, शस्त्र अस्त्र, पालखीचे साहित्य, धार्मिक उत्सवाचे साहित्य, चांदीच्या वस्तूची स्वच्छता करण्यात आली.
श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा शनिवारी 16 एप्रिलला आहे. यासाठी जोतिबा डोंगर येथे यात्रा नियोजनाचे लगबग चालू आहे. रूढी परंपरेनुसार नवरात्रात व चैत्री यात्रेच्या अगोदर व चैत्री यात्रा झाल्यानंतर पंधरा दिवसांनी पाकाळणी आणि विधी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार रविवारी मंदिर परिसरात पाकाळणी विधी उत्साहात व भक्तीमय वातावरणात करण्यात आला.
सकाळी पुजारी, खंडकरी, पुजारी दहा गावकर प्रतिनिधी, देवस्थान समितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी नंदी, महादेव, चोपडाई, जोतिबा, काळभैरव, रामलिंग, दत्त, यमाई मंदिर आणि परिसराची स्वच्छता तसेच मंदिराचे शिखरे, दीपमाळ, ओवऱया, देवाचे दागदागिने, शस्त्र अस्त्र, पालखीचे साहित्य, धार्मिक उत्सवाचे साहित्य, चांदीच्या वस्तूची स्वच्छता करण्यात आली. टँकरने पाण्याची फवारणी करून मंदिर शिखरे व परिसर स्वच्छ करण्यात आला. मंदिरातील देव बावीतील पाण्याने ही स्वच्छता करण्यात आली. दरम्यान पाकाळणी विधी झाल्यानंतर सर्व देवांना महाअभिषेक घालून महा पोषाख घालण्यात आला. त्यानंतर धूपआरती करून, महानैवेद्य दाखवण्यात आला.