अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी; सासनकाठीसह घातली मंदिरात प्रदक्षिणा
कोल्हापूर प्रतिनिधी
चैत्र यात्रेचे औचित्य साधून दख्खनचा राजा जोतिबाचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हापुरात आलेल्या भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. रखरखत्या उन्हात गुलालाने लालेलाल झालेल्या भाविकांनी मंदिर परिसर फुलला होता. रात्री सातनंतर मात्र अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी झाली. ज्यांना वाडीरत्नागिरीला जाता आले नाही अशा भाविकांनी जोतिबा रोडवरील प्राचीन जोतिबा मंदिरात जोतिबाचे दर्शन घेतले. सायंकाळी सहा वाजता जोतिबाचा पालखी सोहळा काढण्यात आला.
वाडीरत्नागिरीतील दख्खनचा राजा जोतिबाचे दर्शन घेतल्यानंतर हजारो भाविक अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आले होते. भाविकांनी अंबाबाईच्या चरणी लीन होत खना नारळाने अंबाबाईची ओटी भरली. त्यामुळे फुल-हार, ओटी, पेढे विक्रेत्यांना हजारो रूपयांचा फायदा झाला. एकदा कोल्हापुरला आले की जोतिबासह अंबाबाईचे दर्शन घेवून जायचे ठरलेले असते. त्यामुळे गेल्या तीन दिवसात हजारो भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. उन्हाच्या चटक्यापासून भाविकांचे संरक्षण व्हावे, यासाठी देवस्थानच्या वतीने मोठा कापडी मंडप उभारला होता.
प्राचीन जोतिबाचा पालखी सोहळा
कोल्हापुरातील प्राचीन जोतिबा मंदिराच्या वतीने पालखी सोहळा काढण्यात आला. पालखी दत्तभिक्षा लिंग येथे गेल्यानंतर तेथील आई यमाई आणि जमदग्नी वृषीचा लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर दिलबहार तालिम, साई मंदिर, खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाव्दार रोडमार्गे जोतिबा मंदिरात पालखी साहेळ्याची सांगता झाली. राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्या हस्ते पालखी सोहळ्याला सुरूवात केली. विलास वणकुंद्रे, रणजीत तांदळे, विशाल बेलवलकर, मनोज शिंदे, उदय पाटील, सुनील कडणे, विजय साळोखे-सरदार, लालासो गायकवाड, सर्व पूजारी, भाविक सहभागी झाले होते. गेल्या 45 वर्षापासून पालखी सोहळा मोठ्या उतसाहात काढला जातो.
भाविकांनी घेतला महाप्रसाद आणि प्रसादाचा लाभ
दख्खनचा राजा जोतिबाचे दर्शन घेवून दमूनभागून आलेल्या भाविकांना श्री महालक्ष्मी अन्नछत्र व श्री महालक्ष्मी दार्मशाळेच्या वतीने अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या मार्गदर्शनाखाली झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले. पंचगंगा घाटावर शिवाजी तरूण मंडळाच्या अन्नछत्रात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. वालावलकर अन्नछत्र, इनरवील अन्नछत्र आणि व्हाईट आर्मीच्या अन्नछत्राचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. अन्नछत्र येथे भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते राबत होते.