किनाऱयावर वाहने टाळण्याचे तज्ञांचे आवाहन
प्रतिनिधी / रत्नागिरी
महाराष्ट्रात 14 पक्षी प्रजाती अति जोखमीच्या असल्याचे अलिकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जोखीमग्रस्त 14 प्रजातींपैकी ग्रेट नॉट पक्षी कोकण किनाऱयावर आढळून येतो. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावी त्याचे अस्तित्व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने नोंदवले आहे. त्याच्या संरक्षणासाठी पर्यटक आणि सामान्य नागरिकांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
12 नोव्हेंबर हा पक्षी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पक्षी मित्र सलीम अली यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या दिवशी पक्षांविषयीचे विशेष उपक्रम आयोजित केले जातात. या दिनाच्या पार्श्वभूमीवर पक्षीतज्ञांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. यावर्षी महाराष्ट्र सरकारने 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताह साजरा करण्याचे ठरवले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने राज्यात 14 पक्षी जाती जोखीम क्षेत्रात असल्याचे अलिकडेच म्हटले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीसह शासकीय मदतीने तयार करण्यात आलेल्या अहवालात या 14 प्रजातींविषयी माहिती देण्यात आली आहे. या 14 पक्षी प्रजाती टिकून रहाव्यात म्हणून सर्वंकष प्रयत्न गरजेचे असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. पक्षी संवर्धनासाठी पक्षीमित्र, शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, सर्वसामान्य नागरिक यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अलिकडे मोठय़ा प्रमाणात पर्यटकांच्या झुंडी समुद्र किनाऱयावर येत असतात. त्यातील अनेक पर्यटक समुद्राच्या पाण्यापर्यंत आपली वाहने नेत असतात. काही पर्यटकांची वाहने तेथेच फसतात. फसलेली वाहने बाहेर काढण्यासाठी दुसऱया वाहनांची मदत घ्यावी लागते. पक्षांना किनारी वाहने नेण्याचा त्रास होतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
कडक थंडीपासून बचावासाठी ग्रेट नॉट कोकण किनाऱयावर
गेट नॉट हा पक्षी समुद्रकिनारी आढळतो. हिवाळ्याच्या मध्यास तो कोकणच्या समुद्रकिनाऱयावर दिसून येतो. हा पक्षी शेकडो किलोमीटर स्थलांतर करुन येतो. समुद्रकिनाऱयावरचे किडे हे त्याचे प्रमुख अन्न आहे. वर्षभरात त्याच्या प्रवासाच्या दिशा ठरल्या आहेत. उत्तरेकडील कडक थंडीपासून बचाव करण्यासाठी हा पक्षी कोकण किनाऱयावर येत असतो.
किनाऱयावर वाहने टाळावीत : तुहिना कट्टी
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या पक्षीतज्ञ तुहिना कट्टी यांनी कोकण किनाऱयावर पक्षी सर्वेक्षण केले आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावी त्यांनी हा पक्षी असल्याचे नोंदवले आहे. त्या म्हणाल्या, ग्रेट नॉट हा पक्षी जोखीमग्रस्त आहे. त्याचे संरक्षण केले पाहिजे. पर्यटकांनी किनाऱयाला लागून आपली वाहने नेऊ नयेत. या पक्षाचा अधिवास असलेल्या क्षेत्रात अधिक काळजी घेतली पाहिजे. या पक्षाचे जतन होणे आवश्यक आहे.









