वृत्तसंस्था/ सिडनी
2021 च्या टेनिस हंगामातील पहिली ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा प्रत्येकवर्षी ऑस्ट्रेलियात खेळविली जाते. सदर स्पर्धा जानेवारीच्या दुसऱया आठवडय़ात सुरू होते पण यावेळी कोरोना समस्येमुळे ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा 8 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱया जोकोव्हिक, नादाल, सेरेना विलीयम्स यांना यापूर्वी मेलबर्नमध्ये स्पर्धा आयोजिकांतर्फे क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली होती, पण आता क्वारंटाईनच्या ठिकाणात बदल करण्यात आला असून ऍडलेडमध्ये त्यांना क्वारंटाईन केले जाईल.
पुढील आठवडय़ापासून या स्पर्धेसाठी विविध देशांच्या टेनिसपटूंचे मेलबोर्नमध्ये आगमन होईल. या स्पर्धेत टेनिसपटू आणि त्यांचा प्रशिक्षक वर्ग अंदाजे 1270 व्यक्ती ऑस्ट्रेलियात येणार आहेत. मेलबोर्नमध्ये दाखल झाल्यानंतर विविध देशांच्या टेनिसपटूंना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन सक्तीचे राहील. सर्बियाचा टॉप सीडेड जोकोव्हिच, स्पेनचा माजी टॉप सीडेड राफेल नदाल आणि अमेरिकेची अनुभवी महिला टेनिसपटू सेरेना विलीयम्स यांना क्वारंटाईनसाठी मेलबेर्नऐवजी ऍडलेडमध्ये व्यवस्था करण्यात आल्याची माहिती स्पर्धां आयोजकांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा नव्याने कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याचे आढळून आल्याने शासनाकडून सर्व खबरदारीचे उपाय अंमलात आणले जात आहेत. ब्रिस्बेनमध्ये सध्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.









