वृत्तसंस्था / व्हिएन्ना
येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील व्हिएन्ना पुरूषांच्या खुल्या टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या जोकोव्हिचने बुधवारी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या विजयामुळे जोकोव्हिचने 2020 च्या टेनिस हंगामाअखेरीस पुरूष मानांकनातील आपले अग्रस्थान निश्चित केले आहे. जोकोव्हिचने आतापर्यंत सहावेळा वर्षअखेरीस अग्रस्थान मिळविले असून त्याने अमेरिकेचा माजी टेनिसपटू पीट सांप्रासच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
बुधवारी झालेल्या सामन्यात जोकोव्हिचने क्रोएशियाच्या कोरिकचा 7-6 (13-11), 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. 2020 च्या टेनिस हंगामात जोकोव्हिचने विविध स्पर्धांमध्ये 39 सामने जिंकले असून केवळ दोन सामने गमविले आहेत. त्याने यापूर्वी म्हणजे 2011, 2012, 2014, 2015 आणि 2018 साली एटीपी मानांकनातील वर्षअखेरीस अग्रस्थान मिळविले होते.









