झेकची मर्केटा, बेन्सिक अंतिम फेरीत, बुस्टा उपांत्य फेरीत, निशिकोरी, मेदवेदेव्ह, स्विटोलिना पराभूत
ऑलिम्पिकमधील टेनिस क्रीडा प्रकारात महिला एकेरीमध्ये झेकची मर्केटा व्होन्ड्रूसोव्हा व स्वित्झर्लंडची बेलिंडा बेन्सिक यांनी अंतिम फेरी गाठली तर पुरुष एकेरीत नोव्हॅक ज्योकोव्हिचचे आव्हान संपुष्टात आले. स्पेनचा पाब्लो कॅरेनो बुस्टाने उपांत्य फेरी गाठली. युक्रेनची स्विटोलिना, कझाकची इलेना रीबाकिना, रशियाचा मेदवेदेव्ह, यजमान जपानचा केई निशिकोरी यांचे आव्हान देखील संपुष्टात आले.
पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत ज्योकोव्हिचला जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेव्हकडून 1-6, 3-6, 6-1, असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत व्होन्ड्रूसोव्हाने स्विटोलिनावर 6-3, 6-1 अशी सहज मात करीत अंतिम फेरी गाठली. शनिवारी तिची स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्सिकशी सुवर्णपदकाची लढत होईल तर स्विटोलिना व रीबाकिना यांच्यात कांस्यपदकासाठी चुरस असेल. बेन्सिकने रीबाकिनाचा चुरशीच्या लढतीत 7-6 (7-2), 4-6, 6-3 असा पराभव करून सुवर्णाचा दुहेरी मुकुट साधण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. पावणेतीन तास रंगलेल्या या लढतीतील पहिला सेट तब्बल 73 मिनिटे चालला होता.
बेन्सिक महिला दुहेरीतही व्हिक्टोरिया गोलुबिकसमवेत खेळत असून त्यांनी उपांत्य फेरी गाठली. एकेरी व दुहेरीची अंतिम फेरी गाठल्यास बेन्सिक ही असा पराक्रम करणारी पाचवी खेळाडू असेल. 1988 मध्ये टेनिसचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला होता.
निशिकोरीला धक्का
पुरुष एकेरीत जागतिक द्वितीय मानांकित मेदवेदेव्हला स्पेनच्या बुस्टाने 6-2, 7-6 (7-5) असे पराभूत केले. बुस्टाची उपांत्य फढत रशियाच्याच कॅरेन खचानोव्हशी होणार आहे. खचनोव्हने फ्रान्सच्या युगो हम्बर्टवर 7-6 (7-4), 4-6, 6-3 अशी मात केली.









