वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या वेस्टर्न आणि सदर्न खुल्या पुरूषांच्या हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टॉप सीडेड जोकोविचने बेरानकीसचा पराभव करत पुढील फेरी गाठली पण ऑस्ट्रीयाच्या थिएमचे आव्हान संपुष्टात आले. अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीची ही शेवटची सरावाची स्पर्धा आहे.
जोकोविचला या स्पर्धेत खेळताना मानेच्या भागामध्ये वेदना जाणवत होत्या. सोमवारी झालेल्या सामन्यात जोकोविचने बेरानकीसचा 7-6 (7-2), 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत शारीरिक तंदुरूस्ती समस्येमुळे जोकोविचने पुरूष दुहेरीतून रविवारी माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. दुसऱया एका सामन्यात अमेरिकेच्या सँडग्रेनने कॅनडाच्या 15 व्या मानांकित ऍलीसिमेचा 6-7 (4-7), 6-2, 7-6 (7-5) असा पराभव केला. सँडग्रेन आणि जोकोविच यांच्यात पुढील फेरीचा सामना होईल. सर्बियाच्या क्रेजीनोव्हिकने ऑस्ट्रीयाच्या थिएमचे आव्हान 6-2, 6-1 असे संपुष्टात आणले. हंगेरीच्या फ्युकसोव्हिक्सने बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हचा 7-5, 4-6, 6-2, ब्रिटनच्या अँडी मरेने जर्मनीच्या ऍलेक्झांडर व्हेरेव्हचा 6-3, 3-6, 7-5, कॅनडाच्या रेओनिकने इव्हान्सचा 6-3, 7-5 असा पराभव केला.









