अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम – बेलिंडा बेन्सिकची आगेकूच, बियान्का अँड्रीस्क्यू, शेल्बी रॉजर्स, स्वायटेक, सिनर यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने जेतेपद मिळविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकताना अमेरिकन ओपन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र यासाठी त्याला थोडा संघर्ष करावा लागला. याशिवाय जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, द.आफ्रिकेचा लॉईड हॅरिस, रशियाचा मेदवेदेव्ह व हॉलंडचा बोटिक व्हान डी झांडशुल्प यांनीही शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले आहे. महिलांमध्ये मारिया सॅकेरी, ब्रिटनची एम्मा रॅडुकानू, स्वित्झर्लंडची बेन्सिक यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. माजी चॅम्पियन बियान्का अँड्रीस्क्यूचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
अग्रमानांकित जोकोविचने अमेरिकेच्या वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या 20 वर्षीय जेन्सन ब्रूक्सबीचा 1-6, 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला. ब्रूक्सबी हा या स्पर्धेत राहिलेला अमेरिकेचा शेवटचा खेळाडू होता. आता अमेरिकेचा एकही महिला अथवा पुरुष टेनिसपटू या स्पर्धेच्या पुढील फेरीत दिसणार नाही. ओपन युगात यजमान देशाचा एकही खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत न दिसण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. या स्पर्धेत अमेरिकेचे एकूण 43 खेळाडू सहभागी झाले होते. जोकोविचची पुढील लढत इटलीच्या सहाव्या मानांकित मॅटेव बेरेटिनीशी होईल. विम्बल्डनच्या अंतिम फेरीतही या दोघांची गाठ पडली होती. एका वर्षात चारही ग्रँडस्लॅम जिंकणारा 1969 नंतरचा पहिला खेळाडू होण्याच्या मार्गावर जोकोविच असून त्याला यासाठी आणखी तीन सामने जिंकावे लागणार आहेत. 22 व्या मानांकित रीली ओपेल्काचे आव्हानही चौथ्या फेरीत समाप्त झाले. त्याला द.आफ्रिकेच्या लॉईड हॅरिसकडून 6-7 (6-8), 6-4, 6-1, 6-3 असा पराभव स्वीकारावा लागला.
जर्मनीच्या चौथ्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने आगेकूच करताना यानिक सिनरचा 6-4, 6-4, 7-6 (9-7) असा पराभव करताना 17 बिनतोड सर्व्हिस केल्या. त्याचा हा सलग 15 वा विजय असून उपांत्यपूर्व फेरी गाठेपर्यंत त्याने फक्त एक सेट गमविला आहे. या फेरीपर्यंत त्याला अजूनपर्यंत कोणाकडून फारसा प्रतिकार झालेला नाही. ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्ण जिंकल्यानंतर सिनसिनॅटी 1000 मास्टर्स स्पर्धा जिंकली आणि यूएस ओपनमध्ये शेवटच्या आठ फेरीपर्यंत मजल मारली आहे. त्याचा शेवटचा पराभव विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत फेलिक्स ऍलियासिमेकडून झाला होता. त्याची उपांत्यपूर्व लढत लॉईड हॅरिसविरुद्ध होणार आहे.
बियान्का अँड्रीक्स्यू पराभूत
महिलांमध्ये 17 व्या मानांकित ग्रीसच्या मारिया सॅकेरीने 2019 मध्ये जेतेपद मिळविलेल्या कॅनडाच्या बियान्का अँड्रीस्क्यूचा 6-7 (2-7), 7-6 (8-6), 6-3 असा पराभव केला. ही संघर्षपूर्ण लढत साडेतीन तास रंगली होती. त्यामुळे महिलांमध्ये यावेळी नवी चॅम्पियन मिळणार हे निश्चित झाले. स्थानिक वेळेनुसार रात्री सव्वादोन वाजता हा सामना संपला. महिलांचा सामना इतक्या उशिरा संपण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. सॅकेरीची उपांत्यपूर्व लढत चौथ्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाशी होणार आहे. अन्य एका सामन्यात ब्रिटनच्या 18 वर्षीय रॅडुकानूने अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सचा 6-2, 6-1 असा धुव्वा उडवत शेवटच्या आठमध्ये प्रवेश मिळविला. रॉजर्सने तिसऱया फेरीत ऍश्ले बार्टीचा पराभव केला होता. पण या कामगिरीची तिला रॅडुकानूविरुद्ध पुनरावृत्ती करता आली नाही. रॅडुकानूची उपांत्यपूर्व लढत स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्सिकशी होणार आहे. विशेष म्हणजे रॅडुकानूनेही या स्पर्धेत अद्याप एकही सेट गमविलेला नाही. ग्रँडस्लॅमच्या पदार्पणात विम्बल्डनमध्ये तिने चौथी फेरी गाठत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते आणि या स्पर्धेत तिने त्यापुढे मजल मारली आहे. आधीच्या फेरीत तिने सारा सोरिबेस टोर्मोचा 6-0, 6-1 असा फडशा पाडला होता.
11 व्या मानांकित व ऑलिम्पिक चॅम्पियन बेलिंडा बेन्सिकने पोलंडच्या प्रेंच ओपन चॅम्पियन इगा स्वायटेकवर 7-6 (14-12), 6-3 अशी मात करीत आगेकूच केली. आता उपांत्यपूर्व फेरीत लेला फर्नांडेझ व पाचवी मानांकित इलिना स्विटोलिना यांच्यात लढत होणार आहे.









