अमेरिकन ओपन टेनिस : लाईन जजला चेंडू मारल्याने पंचांनी केली कारवाई
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
जागतिक अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचचे 18 वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले असून अनावधानाने झालेल्या चुकीमुळे त्याला अपात्र ठरवून स्पर्धेबाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे ग्रँडस्लॅम विजेता एकही खेळाडू आता स्पर्धेत राहिला नसल्याने यावेळी या स्पर्धेला नवा विजेता मिळणार आहे.
चौथ्या फेरीच्या सामन्यात पाब्लो कॅरेनो बुस्टाविरुद्ध तो पहिल्या सेटमध्ये 5-6 असा पिछाडीवर पडला होता. गेम संपल्यावर तो चेंजओव्हरसाठी बाजूला गेला असताना त्याने रागाच्या भरात चेंडू जोरात आपल्या मागे मारला. पण तो नेमका लाईन जज असणाऱया महिलेच्या चेहऱयावर जोरदार आदळल्याने ती गळय़ाला धरत खाली बसली. हे लक्षात आल्यावर जोकोविच व चेअर अंपायर यांनी तिची विचारपूस केली. जोकोविचने यावेळी तिची माफीही मागितली. रागाच्या भरात आपल्याकडून ही चूक घडली आहे. पण आपण हे कृत्य हेतुपूर्वक केले नसल्याचे त्याने चेअर अंपायरना सांगितले. स्पर्धेचे रेफरी सोरेन फ्रीमेल, ग्रँडस्लॅम सुपरवायजर आंद्रेयास इगली व चेअर अंपायर ऑरेली टूर्ट यांच्यात यावेळी दहा मिनिटे चर्चा झाली. त्यावेळी फ्रीमेल यांनी जोकोविचची बाजू मांडली. त्याची चूक नसल्याचे त्यांनी मान्य केले असले तरी लाईन जज जखमी झाल्याने अखेर नियमानुसार फ्रीमेल यांनीच त्याला स्पर्धेबाहेर काढल्याचा निर्णय सांगितला. जोकोविचने हा निर्णय मान्य केला आणि बुस्टाशी हस्तांदोलन करून त्याने कोर्ट सोडले. जोकोविचला आता या स्पर्धेत मिळविलेले मानांकन गुण व मिळणारी 250,000 डॉलर्स रक्कम सोडून द्यावी लागणार आहे.
या निर्णयाचा धक्का बसला असल्याचे जोकोविचचा प्रतिस्पर्धी बुस्टाने नंतर सांगितले. कॅनडाचा शॅपोव्हॅलोव्ह हा त्याचा पुढील फेरीतील प्रतिस्पर्धी आहे. जोकोविचनेही नंतर ताबडतोब कोर्ट सोडले आणि पत्रकारांशी न बोलताच तो बाहेर गेला. नंतर सोशल मीडियावर त्याने या घटनेबद्दल खेद व्यक्त करीत सर्वांचीच माफी मागितली. स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याने या मोसमातील त्याची 26 सामन्यांची विजयी घोडदौड रोखली गेली आहे. गेल्या सात ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी त्याने पाच स्पर्धा जिंकल्याने त्याची ग्रँडस्लॅम जेतेपदाची संख्या 17 वर पोहोचली होती. नदालने 19 तर फेडररने 20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत.









