काँग्रेसचा सरकारवर आरोप : किती नोकऱया दिल्या ते जाहीर करण्याची मागणी
प्रतिनिधी /पणजी
‘मेगा जॉब फेअर्स’च्या नावाखाली सरकारकडून तरुणांची फसवणूक करण्यात येत असून त्यांना भेडसावणाऱया समस्यांकडे सरकारने डोळेझाक केली आहे, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीने केला आहे. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या या भरती मेळाव्यातील नोकऱयांची संख्या आणि लोकांच्या संख्येतील असमानतेवर काँग्रेसने सरकारकडे उत्तरे मागितली आहेत.
पक्षाचे पदाधिकारी विजय भिके, एल्विस गोम्स, आणि इतरांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी श्रम आणि रोजगार आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. त्यावेळी बोलताना भिके यांनी, लाभदायक रोजगार हा तरुणांचा हक्क असल्याचे सांगितले. परंतु रोजगार मेळाव्याच्या नावाखाली सरकार तरुणांची फसवणूक करत आहे. गोव्यातील तरुणांच्या समस्यांचे सरकारला काहीच पडून गेलेले नाही, असा आरोप त्यांनी केला. ’मेगा जॉब फेअर’च्या नावाखाली लोक सरकारच्या नाटकीपणाला बळी पडत आहेत. शेवटी कुणालाच नोकरी मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला.
श्री. गोम्स यांनी बोलताना, ‘खरे तर सरकारने खाजगी नोकऱयांप्रमाणेच सरकारी नोकऱयांसाठीही भरती मेळावे आयोजित केले पाहिजेत. कर्मचारी भरती आयोग हा 2018 मध्ये संमत झालेला कायदा होता. तो मध्यंतरी कोणी थांबवला? असा सवाल गोम्स यांनी उपस्थित केला.
मेगा जॉब फेअरच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोम्स यांनी, ज्यांना नोकरी देण्यात येणार आहे, त्यांना नोकरीची सुरक्षा कोण देणार आहे? ’किमान वेतन’ संबंधी कलम पाळले जाईल का? प्रत्यक्षात किती नोकऱया दिल्या? यासंबंधी उत्तरे सरकारने द्यावी, अशी मागणी गोम्स यांनी केली आहे.









