आपत्कालीन वापरास केंद्र सरकारची मान्यता – कोरोनाविरोधी लढय़ात आता पाचवी लस उपलब्ध
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल-डोस लसीच्या आपत्कालीन वापरास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आता ती लवकरच भारतीय बाजारात मिळण्याची आशा वाढली आहे. कंपनीने शुक्रवारीच आपत्कालीन मंजुरीसाठी अर्ज केल्यानंतर भारतीय औषध नियंत्रक जनरलने (डीसीजीआय) त्याला मंजुरी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी सोशल मीडियावर दिली. या लसीच्या माध्यमातून लवकरच देशात मोहिमेला गती येऊ शकते. केंद्र सरकार सध्या लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला परवानगी दिल्यामुळे भारतात सध्या परवानगी असलेल्या लसींमध्ये अजून एका लसीची भर पडली आहे. त्यामुळे आता भारताकडे कोरोनाविरोधात एकूण 5 लसी झाल्या आहेत. याआधी कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक-व्ही आणि मॉडर्ना या लसींना भारतात वापराची परवानगी देण्यात आली आहे. आता भारतात कोरोनाविरोधातील पाचव्या लसीला परवानगी मिळाल्यामुळे देशाच्या कोरोनाविरोधातील लढय़ाला आणखी बळ मिळेल, असे ट्विट मनसुख मांडविया यांनी केले आहे.
सिंगल डोस लस, 85 टक्के प्रभावी
दरम्यान, भारतात परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन ही पहिलीच सिंगल डोस लस असून दोनच दिवसांपूर्वी कंपनीने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या लसीचा एक डोस प्रभावशाली असल्याचा कंपनीचा दावा आहे. कोरोनावर जॉन्सन अँड जॉन्सनची लस 85 टक्के प्रभावी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील व्हेरिएंटवरही प्रभावशील असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
अमेरिकन लस, भारतातही निर्मिती
जॉन्सन अँड जॉन्सनने या लसीला जैन्सन (Ad26.COV2.S) असे नाव दिले असून अमेरिकन कंपनीने ही लस तयार केली आहे. लसनिर्मितीमध्ये सॅनोफी आणि नोव्हा व्हॅक्स यांचाही सहभाग आहे. या लसीच्या भारतातील उत्पादनासाठी हैदराबादस्थित कंपनी बायोलॉजिकल-ई या कंपनीसोबत करार झालेला आहे. सध्या 59 देशांमध्ये ही लस वापरली जात आहे. ही लस चाचणीमध्ये 66 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. ही लस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यापूर्वी फ्रीजरमध्ये ठेवण्याची गरज नाही.









