ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीच्या औरंगजेब रोडवरील इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे.
या दहशतवादी संघटनेने टेलिग्रामच्या माध्यमातून स्फोटाची कबुली दिली आहे. त्यांनी टेलिग्रामच्या संदेशात म्हटले आहे की, ‘सर्वशक्तिमान अल्लाहच्या कृपेने आणि मदतीने जैश-उल-हिंदचे सैनिक दिल्लीच्या एका उच्च सुरक्षा क्षेत्रात घुसून आयईडी स्फोट घडवून आणू शकले. ही तर हल्ल्यांची एक सुरूवात आहे.’
दरम्यान, स्फोटात वापरण्यात आलेल्या स्फोटकांचा दिल्ली पोलिसांनी दोन वेळा तपास केला. स्फोटात उच्च दर्जाची लष्करी स्फोटके सापडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्फोटानंतर शुक्रवारी रात्री इराणला जाणाऱ्या विमानालाही उशीर झाला. सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली, पण काहीही संशयास्पद आढळले नाही. अल कायदासारखे प्रशिक्षित गट या ग्रेडची स्फोटके वापरत असावी, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.