रोजच्या धावपळीच्या जीवनात ‘कर्ण दोष’ या शारीरिक अवस्थेकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले जात नाही. विशेषतः ज्ये÷ नागरिक ‘वयोमानानुसार कमीच ऐकू येणार’ असा विचार करताना दिसून येतात. दिवसेंदिवस केवळ वयस्कच नव्हे तर सर्व वयोगटात ‘कर्णदोषा’चे प्रमाण वाढत जाणार आहे. श्रवणदोष ही सर्व प्रकारच्या वयोगटातील व्यक्तींना भेडसावणारी समस्या असू शकते.
नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत. गर्भधारणेच्या काळात निर्माण झालेली गुंतागुंत, अपुऱया दिवसांचे बाळ किंवा जन्मतः कमी वजनाचे बाळ, जन्मतः बाळाच्या मेंदूला प्राणवायुचा पुरवठा कमी होणे, मेंदुज्वर, जन्मानंतर अधिक प्रमाणातील कावीळ, अनुवंशिकता आदी कारणांमुळे नवजात बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होण्याची शक्मयता अधिक असते. अपघातांमुळे डोक्मयाला वा कानाला इजा पोहोचल्यानेही श्रवण क्षमतेत बिघाड उत्पन्न होऊ शकतो. धुम्रपान करणाऱया व्यक्तींमध्ये श्रवणदोष मोठय़ा प्रमाणावर आढळून येतो. धुम्रपान करणाऱया तीसपैकी अकरा व्यक्तींना बहिरेपणाची समस्या असल्याचे नागपूरमध्ये झालेल्या एका खासगी रुग्णालयाच्या अभ्यासातून समोर आले आहे. ऐंशी डेसीबलपेक्षा अधिक क्षमतेचा आवाज वारंवार कानावर पडल्याने, सातत्याने मोठय़ा आवाजात बोलल्याने ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय सातत्याने हानीकारक रसायनांच्या वा औषधांच्या (ओटोटॉक्सीक मेडिसीन/केमिकल्स) संपर्कात आल्यानेही कानास इजा पोचू शकते. कानातील हाड वाढणे (ओटोक्लेरोसिस), सर्दी-पडसे आजारात जोराने नाक शिंकरणे, जंतुसंसर्गामुळे कानातून पू वाहणे यासारख्या समस्यांवर वेळीच इलाज न केल्यास श्रवण क्षमतेवर कायमस्वरुपी दुष्परिणाम होऊ शकतो. पोषणयुक्त आहाराची कमतरता हेदेखील श्रवणदोषामागील एक कारण आहे.
श्रवणदोषाकडे केवळ ‘शारीरिक व्यंग’ इतक्मया मर्यादित अर्थाने पाहता येणार नाही. ते व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला व्यापणारे आहे. श्रवणदोष सर्वप्रथम माणसाच्या संवाद क्षमतेवर दुष्प्रभाव करणारा ठरतो. बोलता न येणाऱया व्यक्तीला श्रवणदोष असेल, किंवा श्रवणदोष असणाऱया व्यक्तींना बोलण्याची समस्या असेल हे चुकीचे गृहितक त्यामागील एक कारण आहे. जन्मतः वा जन्मानंतर लगेचच श्रवण क्षमतेवर होणाऱया दुष्परिणामांकडे कौटुंबिक व सामाजिक पातळीवर दुर्लक्ष झाल्यास बोलण्याची क्षमता अविकसित राहते. लहान मुलांच्या बाबतीत भाषा विकासावर पर्यायाने त्यांच्या शिक्षणावर, बौद्धिक विकासावर परिणाम होतो. श्रवणयंत्राची असुविधाजनक रचना, त्याच्या वापराने व्यंगत्वाचे लक्षात येणे आणि या सर्व बाबतीत असणारा समुपदेशनाचा अभाव यामुळे अनेकजण श्रवण यंत्राचा वापर करण्यास टाळाटाळ करतात. श्रवणदोषामुळे वयस्क व्यक्तींच्या पारस्पारिक संबंधांवर, रोजगारावर, स्मृती पटलावर, कौटुंबिक-सामाजिक जीवनावर, भावनिक-मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतो. 60… बालकांमधील श्रवणदोष हे प्रतिबंधात्मक उपायांनी रोखता येऊ शकतात.
लसीकरण, प्रसूतिपूर्व सुधारित सेवेचा लाभ, नवजात शिशुंची काळजी, श्रवणदोष तपासणी, दोष आढळल्यास लवकरात-लवकर प्रभावी आणि सुयोग्य हस्तक्षेप आदि उपाययोजना लहान मुलांमधील श्रवणदोष वेळीच दूर करण्यास सहाय्यक ठरतात. कान साफ करण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळेही अनेकदा कानात खोलवर इजा पोहोचून त्याचा परिणाम ऐकण्याच्या क्षमतेवर झालेला पहायला मिळतो. रेल्वे स्टेशनसारख्या परिसरात रस्त्याच्या कडेला बसलेली कान साफ करून देणारी माणसे आपल्यापैकी अनेकांनी पाहिलेली, कदाचित अनुभवलेलीही असतील. धारदार टोकदार वस्तूने कान साफ करणे, कानातील मळ वेळोवेळी साफ न करणे, सर्दी पडसे झाले असताना जोराने नाक शिंकरणे, कान दुखत असेल, ठणकत असेल अथवा त्यात काही किडा/मुंगी गेली असेल तर त्यात गरम तेल, दूध, झाडपाल्याचा रस तत्सम द्रव पदार्थ टाकणे असे अशास्त्रीय उपाय घरगुती पातळीवर केले जातात. लहान मुलांच्या कानातून पू/पाणी येणे याकडे तर बरेचदा दुर्लक्ष केले जाते.
‘कानाची काळजी’ आणि आपल्या सर्वच ज्ञानेंद्रियाची काळजी हा विषय सातत्यपूर्ण जनजागृतीचा आहे, हे आपण अनेकदा विसरून जातो. अनेक देशांच्या राष्ट्रीय आरोग्य धोरणांमध्ये त्याचा स्वतंत्रपणे विचार केला गेलेला दिसून येत नाही. लोकसंख्येच्या तुलनेत आधुनिक तपासणी यंत्रणा आणि ऑडिओलॉजिस्ट, कान-नाक-घसा तज्ञ, स्पीच थेरेपिस्ट, ऑक्मयुपेशनल थेरपिस्ट आदि तज्ञ व्यक्तींची उपलब्धता ही अनेक देशांमध्ये व्यस्त प्रमाणात असलेली दिसून येते. निम्न उत्पन्न गटातील देशांमध्ये दहा लाख लोकसंख्येमागे एक कान-नाक-घसा तज्ञ असणाऱया देशांचे प्रमाण 78…, एका पेक्षाही कमी ऑडिओलॉजिस्ट असणाऱया देशांचे प्रमाण 93…, एक वा एकापेक्षा जास्त स्पीच थेरपिस्ट असणाऱया देशांचे प्रमाण 17… आणि एक वा एकापेक्षा अधिक विशेष शिक्षक असणाऱया देशांचे प्रमाण 50… असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झालेले आहे.
कोविडच्या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण, कार्यालयीन कामकाजाकरिता अपरिहार्य झालेला हेडफोनचा वापर, व्यक्तीकेंद्रीत मनोरंजन पद्धतीमुळे झुकत असलेला समाज यामुळे हेडफोन वापरण्याचे प्रमाण वाढतच आहे. कोविड काळात सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदीमुळे ध्वनी प्रदूषणाची पातळी कमी झाली असली तरी हे चित्र कायमच राहील असे नाही. 3 मार्च 2021 या जागतिक श्रवण दिनी जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या जागतिक श्रवण अहवालात (वर्ल्ड रिपोर्ट ऑन हिअरिंग) पुढील 3 दशकात श्रवणदोष असणाऱया व्यक्तींची संख्या दीडपटीने वाढणार असल्याची शक्मयता नोंदवली आहे. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती. कान-नाक-घसा तज्ञ म्हणून त्यांचे या क्षेत्रात गेली 4 दशके योगदान राहिले आहे. भारतात श्रवणदोष दूर करण्याच्या संदर्भात होत असलेल्या विशेष प्रयत्नांचा डॉ. हर्षवर्धन यांनी केलेला उल्लेख हा आपल्या सर्वांसाठी आशादायी आहे. या प्रयत्नांसोबतच या क्षेत्रातील मानवी संसाधनांना बळकटी देणेही गरजेचे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱयांची श्रवणदोष तपासणी, उपचार आदि प्रशिक्षण, लवकरात लवकर निदान, पाठपुरावा माता-बाल आरोग्य, बाबतची जनजागृती, संवेदनशीलतेवर आणखी काम करण्याची आवश्यकता आहे. श्रवणदोषाचा राष्ट्रीय मनुष्य संपत्तीच्या दृष्टीकोनातून विचार झाल्यास भविष्यात श्रवणदोष व्यक्तींचे प्रमाण कमी होईल, हे निश्चित!








