अध्याय तेरावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, माणसाने सत्त्वगुणाच्या वृद्धीसाठी सात्त्विक पदार्थांचेच सेवन करावे. त्यामुळे धर्म वाढून ज्ञान उत्पन्न होईल आणि ज्ञानामुळे आत्मसाक्षात्कार होऊन सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतील. सात्त्विक पदार्थांचे सेवन केले असता सत्वगुणाची वृद्धि होते आणि सत्त्वगुणाची वृद्धि झाली की, धर्माचरणाकडे आपोआपच प्रवृत्ती होते. धर्माचरणाच्याप्रवृत्तीने माझे भजन घडते आणि माझ्या भक्तीचा उल्हास वाढला की, भक्तांना मी प्रसन्न होतो. त्यावेळी आत्मज्ञानही आपोआप प्रगट होते असे समज. पूर्णपणे सत्त्वशुद्धि झाली असताही जोपर्यंत धर्मबुद्धि प्रगट होत नाही, तोपर्यंत, आत्मज्ञानाचीही सिद्धि व्हावयाची नाही. अंतःकरणातील लोभ जोपर्यंत सुटला नाही, तोपर्यंत खरे ज्ञान कसे मिळणार ? जेव्हा सत्त्वशुद्धि आणि धर्म ही दोन्ही स्पष्ट दिसू लागतील, तेव्हाच साधक आत्मज्ञानाच्या जोरदार प्रेरणेने योग्य मार्गाला लागतो. धर्ममार्गाने वागत असतानाही जर माझी भक्ती सोबतीला असेल तरच चोरापासून अडवणूक होत नाही व झटदिशी तो मला येऊन मिळतो. जर भक्तीची संगत सोडून दिली तर काम-क्रोध घात करण्याला प्रवृत्त होतात आणि विकल्परूप भोवरे मनुष्याला बुडवतात. भक्तीच्या संगतीने मार्ग चालू लागले असता यत्किंचितही अडचण पडत नाही. आणखी एक म्हणजे भाग्याशिवाय माझी भक्ती प्राण्यांच्या संगतीला असत नाही. माझ्या भक्तीबरोबर मोठे शूर व नावाजलेले असे नऊ प्रकारचे वीर असतात. ते युद्धाला सदैव सज्ज असून सदोदित शत्रूच्या समोर उभे राहतात. आत्मज्ञानाच्या योगाने ते मोठे योद्धे बनले आहेत. म्हणून माझ्या भक्तीशिवाय हजारो प्रकारांनी श्रवण व मनन केले असतानाही माझी प्राप्ती होत नाही. भजनानेच माझी पूर्ण प्राप्ती होते. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी भगवंताचीच भावना ठेवणे ह्याचंच नांव श्रे÷ भक्ती होय. ती स्वतःच सोबतीण झाली म्हणजे काम, क्रोध, मोह हे पीडा देऊ शकत नाहीत. म्हणून अत्यंत आदराने आणि धर्मशील बुद्धीने माझे भजन केले असता मी प्रसन्न होतो आणि माझ्या प्रसादानेच ज्ञान प्रकाशित होते. उद्धवा ! असे न करता अर्थावर आणि स्वार्थावरच लोभदृष्टि ठेवून माझी कोरडीच भक्ती केली तर मी लक्ष्मीपति, प्रसन्न होत नाही, हे निश्चित समज. जो धन, मन, शरीर, वाणी झिजवून माझं भजन करतो, त्यालाच, चंद्रकिरणांनी चकोर प्रसन्न होतो त्याप्रमाणे, मी प्रसन्न होतो. व्यालेली गाय जशी वत्साला स्नेहभरित होऊन दूध देते, त्याप्रमाणे अत्यंत संतोषाने मीही प्रसन्न होतो. त्या माझ्या प्रसादाच्या योगानेच माझे ज्ञान माझ्या भक्तांना प्रगट होते. मोठी सद्गुणी, सुंदर आणि पतिव्रता असून पतीला अत्यंत आवडणारी स्त्री असेल तर तिचा पती तिने न मागताच तिला सर्वस्व देतो, त्याप्रमाणे मी माझ्या भक्तांना प्रसन्न होतो. माझ्याच प्रसादाने जे ज्ञान प्रगट होते, त्यालाच ‘श्रुति’ व ‘स्मृति’ अशी नावे देतात हे लक्षात ठेव. सहज लीलेने अविद्येचा नाश होतो. गुणांपासून देह उत्पन्न होतोच पण देहापासून ज्ञान उत्पन्न होते आणि त्याच ज्ञानाने गुणांचा नाश होतो. हे माहीत असूनही देहाचे काही समाधान होत नाही. जेव्हढी म्हणून देहभोगाची साधने आहेत त्यांचा कितीही उपभोग घेतला तरी देहाला संतुष्टता कशी ती माहीत नसते. हे निरूपण ऐकून उद्धवाला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, लोकांवर केवढा हा संकटप्रसंग आपोआप ओढवला आहे ! ह्या नश्वर देहापासून परब्रह्माचा आनंद प्राप्त होतो. असे असताना तो सर्वोच्च आनंद सोडून देऊन दुर्दैवी लोक विषयांवरच लुब्ध होऊन मर मर मरतात ! सात्विक सेवनाने सत्त्वाची वृद्धि होते, आणि तेणेकरून दुर्मिळ अशा सिद्धीचा लाभ होतो. पण ती सिद्धि सोडून देऊन दुर्बुद्धि लोक विषयाच्या विधीमध्येच रममाण होतात! हा लोकांमध्ये केवढा अनर्थ माजला आहे ! अशी उद्धवाच्या मनात शंका उत्पन्न झाली, म्हणूनच मोठय़ा जिज्ञासेने त्याने श्रीकृष्णाला विचारले. भगवान ! साधारणतः सर्वच माणसांना हे माहीत आहे की, विषय हे संकटांचे घर आहे तरीसुद्धा ती माणसे कुत्री, बोकडांप्रमाणे ते विषय का भोगत राहतात ?
क्रमशः







