प्रतिनिधी/ चिपळूण
शंभर टक्के वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जे. के. तालाबोट कंपनीतील 226 कामगारांनी गेल्या 11 दिवसांपासून पुकारलेला संप अखेर मिटल्याने बुधवारी कंपनीचे गेट उघडले आहे. कामगार युनियन आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये यशस्वी तोडगा निघाला असून 80 टक्के वेतन आणि चार कामगारांवरील निलंबन मागे घेण्यात आले. त्यामुळे बुधवारपासून कंपनीचे उत्पादन पूर्ववत सुरू झाले.
कोरोना लॉकडाऊनमध्ये गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या जे. के. तालाबोट कंपनीने 8 मेनंतर शंभर टक्के उत्पादन सुरू केले. मात्र मार्च 2021 पर्यंत 50 टक्केच वेतन देणार असल्याचे जाहीर केले. शंभर टक्के उत्पादन काढॅन आम्हाला 50 टक्केच वेतन का, असा सवाल करत कामगारांनी संप पुकारला. कामगारांच्या इंजिनिरिंग वर्क्स असोसिएशनच्या माध्यमातून व्यवस्थापनाशी चर्चा सुरू असतानाच कंपनीने हमीपत्र दिल्याशिवाय कंपनीत प्रवेश देणार नसल्याची नोटीस बजावत प्रवेशद्वार बंद पेले. त्यातच व्यवस्थापनाने चार कामगारांना निलंबनाची नोटीस बजावल्यानंतर कामगाराच्या असंतोषात भर पडली.
दरम्यान, युनियन आणि व्यवस्थापन यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत अखेर यशस्वी तोडगा निघाला आहे. पुढील दहा महिने 80 टक्के वेतन देण्यास कंपनी तयार झाली. तशी लेखी हमीही दिली आहे. कामगारही या तडजोडीस तयार झाले. शिवाय निलंबित केलेल्या 4 कामगारांवरील कारवाई मागे घेण्यात आली आहे. बुधवारी अन्य कामगारांबरोबर कारवाई झालेल्या कामगारांनाही कंपनीत प्रवेश देण्यात आला आहे. मात्र व्यवस्थापन त्यांची अंतर्गत चौकशी करणार आहे. संपामुळे गेल्या 11 दिवसांपासून बंद असलेले उत्पादन बुधवारपासून सुरू झाले आहे.









