पूँछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक – संशयितांच्या शोधासाठी शोधमोहीम
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील पूँछ भागात सोमवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्यदलाचे 5 जवान हुतात्मा झाले. हुतात्मा झालेल्यांमध्ये एका जेसीओचा (ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर) समावेश आहे. या चकमकीनंतर सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली.
पूँछमधील सुरनकोटच्या डेरा की गली गावात काही दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती सुरक्षा दलाला गुप्तचर विभागाकडून प्राप्त झाली होती. या माहितीनंतर या भागात सोमवारी सकाळपासूनच सुरक्षा दलाने घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. याचदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. यावेळी झालेल्या संघर्षात 4 जवानांसह एक जेसीओ जखमी झाले. सर्वांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनी रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला.
परिसरात नाकाबंदी
चकमकीनंतर आता सुरनकोट भागात अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले. दहशतवादी पळून जाऊ नये म्हणून पूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली. मात्र, सायंकाळपर्यंत एकाही दहशतवाद्याचा मागमूस लागू शकला नव्हता. जंगलात 4-5 दहशतवादी मोठय़ा शस्त्रसाठय़ासह असल्याचा अंदाज आहे. दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून आले असून ते सध्या जंगलभागातच असल्याचा दावा करण्यात येत आहे.
दहशतवादी कारवाया वाढल्याने चिंतेचे ढग
गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्य लोक सतत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. राज्यात गेल्या एका वर्षात 25 लोकांची हत्या झाली आहे. गेल्या पाच दिवसांत अशा सात घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. श्रीनगरमधील एका सरकारी शाळेत गुरुवारी दोन बिगर मुस्लीम शिक्षकांवर गोळय़ा झाडण्यात आल्या होत्या. सध्या काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या असल्या तरी नजिकच्या काळात अन्यत्रही हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काळात दहशतवादी घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्मयता आहे.
तालिबानी सत्तेमुळे वाढले दहशतवाद्यांचे बळ
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून दहशतवादी संघटनांचे बळ वाढलेले दिसत आहे. आयएसआय अफगाणिस्तानातून शस्त्रे आणि दहशतवाद्यांना काश्मीरकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच फटका भारताला बसत आहे. आता सीमेवरील परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नसल्यामुळे सुरक्षा दलांनी पूर्ण सतर्क राहणे आवश्यक आहे. केवळ काश्मीरमध्येच नाही, तर देशाच्या इतर भागातही सुरक्षा दलांनी सतर्क राहायला हवे, असा इशारा वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱयांकडून दिला जात आहे.









