मुंबई / ऑनलाईन टीम
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र लसीचा तुटवड्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिक सुरूच झाली आहे. कोरोना लसीचं वितरण हे लोकसंख्येचा आधारावर नाही तर राज्यांच्या लसीकरणाच्या कामगिरीवर आधारित असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फडणवीसांवर जोरदार पलटवार केलाय.
रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे की, ”लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करतायेत. केंद्र सरकारच्या गृहितकानुसार वेस्ट रेट हा १०% असू शकतो,पण आपण तो अवघा ३% ठेवला. राज्यातील रुग्णसंख्या बघता लस पुरवठा किती व्हावा, याचा विरोधकांनी विचार करावा. महाराष्ट्राला १.०६ कोटी डोस मिळाले असून आज संध्याकाळपर्यंत आपण दोन्ही डोस मिळून ९३.३२ लाख लोकांचं लसीकरण पूर्ण केलं तर ३ लाख डोस वाया गेले. आज आपल्याकडे १० लाख डोस शिल्लक असून ते परवापर्यंत संपतील. आज काही ठिकाणी लसीचा साठा संपला.
त्यामुळे लसीकरण ठप्प झालं. वास्तविक आपण लसीकरणाचा वेग वाढवलाय. लसीकरण केंद्रावर नोंदणी केल्यानंतर अवघ्या पाच-दहा मिनिटात लस दिली जातेय. पण मागणीच्या प्रमाणात पुरवठा लस उपलब्ध नसल्याने लसीकरणामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत लसीकरणाचा वेग अजून किती वाढवायचा? केंद्राकडून लसींचा पुरवठा वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करणं हे राजकारण आहे का? राज्याला तातडीने अधिक लस मिळाव्यात याला विरोध आहे का? या प्रश्नांची उत्तरं राज्याच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी द्यावीत!
‘केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आणि कशी मदत केली, हे सांगायची आता वेळ नाही. योग्य वेळी ते जनतेला नक्की कळेल. सध्या राज्याला संकटातून बाहेर काढायची वेळ आहे. त्यासाठी विरोधी पक्षाचे नेते नक्कीच हातभार लावतील, ही अपेक्षा. विरोधी पक्षाला विनंती आहे की, किमान संकट काळात तरी राजकारण करू नका. सरकार पडणार नाहीच पण ते पडावं यासाठी आपण जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावेत. संकटकाळी जनतेसोबत, सरकारसोबत उभं रहावं. महाराष्ट्र आपला सदैव ऋणी राहील!”, असा खडा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.









