वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
रविवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत यजमान न्यूझीलंडने पाकला पहिल्या डावात 297 धावांवर रोखले. पाकच्या अझहर अलीचे शतक 7 धावांनी हुकले तर न्यूझीलंडच्या जेमीसनने 5 बळी मिळविले.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. वेगवान गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा न्यूझीलंडच्या जेमिसनने तसेच साऊदी आणि बोल्ट यांनी पुरेपूर फायदा उठविला. दरम्यान पाकच्या अझहर अलीने एका बाजुने चिवट फलंदाजी करत 93 धावांचे योगदान दिल्याने पाकला 297 धावांपर्यंत मजल मारता आली. सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर उपाहारापूर्वीच्या सत्रामध्ये जेमिसनची तीन षटके चांगलीच भेदक ठरली. जेमिसनने पाकच्या अबीद अलीला 25 धावांवर, हॅरीस सोहेलला एका धावेवर आणि फवाद आलमला 2 धावांवर बाद केले. सलामीचा शान मसूद खाते उघडण्यापूर्वी साऊदीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पाकची एकवेळ स्थिती 4 बाद 83 अशी केविलवाणी होती.
अझहर अलीने कर्णधार मोहम्मद रिझवानसमवेत पाचव्या गडय़ासाठी 88 धावांची भागिदारी केली. रिझवानने 71 चेंडूत 11 चौकारांसह 61 धावा जमविल्या. जेमिसनने त्याला झेलबाद केले. रिझवान बाद झाल्यानंतर अझहर अलीला अश्रफकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने सातव्या गडय़ासाठी 56 धावांची भर घातली. जेमिसननेच अश्रफला झेलबाद केले. त्याने 8 चौकारांसह 48 :धावा जमविल्या. अझहर अलीने अबीद अलीसमवेत दुसऱया गडय़ासाठी 62 धावांची भागिदारी केली. पाकच्या जाफर गोहरने 6 चौकारांसह 34 धावा जमविल्या. अझहर अली सहाव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. हेन्रीने त्याला झेलबाद केले. अझहर अलीने 172 चेंडूत 12 चौकारांसह 93 धावा जमविल्या. पाकचा पहिला डाव 83.5 षटकांत 297 धावांवर आटोपला. जेमिसनने 69 धावांत 5 तर साऊदी आणि बोल्ट यांनी प्रत्येकी दोन आणि हेन्रीने एक गडी बाद केला. जेमिसनची ही दहावी कसोटी आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावाला सोमवारी प्रारंभ होईल.
संक्षिप्त धावफलक : पाक प. डाव 83.5 षटकांत सर्वबाद 297 (अझहर अली 93, अबीद अली 25, मोहम्मद रिझवान 61, अश्रफ 48, जाफर गोहर 34, नसीम शहा 12, जेमिसन 5-69, बोल्ट 2-82, साऊदी 2-61, हेन्री 1-68.