प्रतिनिधी /पणजी :
सांताक्रूज गँगवॉर प्रकरणातील मुख्य संशियत जेनीटो कार्दोज याला काल न्यायालात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गँगवॉर प्रकरणात आत्तापर्यंत 22 संशयितांना अटक करण्यात आली असून तीघेजण अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मुख्य संशय़ित जेनीटो बुधवारी पोलिसांना शरण आल्याने आत एकूण गँगवॉर प्रकरणात 23 संशयितांना अटक करण्यात आली आहे.
20 जून रोजी पहाटे कुविख्यात गुंड इम्रान बेपारी याची हत्या करण्यासाठी सुमारे 10 जणांची टोळी त्याच्या घराकडे दाखल झाली होती. दाखल झालेल्या टोळीने बेपारी याच्या घरावर तसेच त्याच्या गाडीवर गोळ्या झाडल्या होत्या. याचवेळी हत्या करण्यासाठी आलेल्या टोळीतील सोनू यादव यालाच गोळी लागून त्याचा मृत्य झाला होता.
गँगवॉर प्रकरणाची माहिती पोलिसांनी मिळाताच त्यांनी अज्ञात संशयितां विरोधात गुन्हा नोंद केला होता. तपासकामा दरम्यान हा प्रकार दोन गँगमधील असल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी संशयितांना अटक करण्यास सुरुवात केली व तब्बल 22 संशयितांना अटक केली होती. तर 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील मुख्य संशयित जेनीटो कार्दोज मात्र पोलिसांना हुलकावणी देत होता. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी महाराष्ट्रा, कर्नाटक या शेजारील राज्यातही त्याचा शोध घेतला होता. दरम्यान जेनीटो याने येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळ्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी होण्या अगोदरच जेनीटो याने आपल्या वकीलासह येथील एसडीपीओ कार्यालयात येऊन बुधवारी पोलिसांना शरण आला. काल गुरुवारी त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.









