जि.पं.सामाजिक न्याय स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
सामाजिक न्याय स्थायी समितीची बैठक जिल्हा पंचायतीच्या सभागृहात झाली. यावेळी अधिकाऱयांना मागील वषी जो आराखडा तयार करण्यात आला आहे, त्यामध्ये दुरुस्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे. काही ठिकाणी नको त्या योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र ज्या ठिकाणी गरज आहे तसेच ज्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे त्यांनाच या योजना देणे गरजेचे असून त्यामध्ये दुरुस्ती करण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे.
मागील वषी पुरामध्ये अनुसूचित जाती-जमातींच्या व्यक्तींची घरे पडली आहेत. याचबरोबर काही जणांची शौचालयेदेखील पडली आहेत, त्यांना तातडीने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. देवराज अर्स कॉलनीमध्ये ज्यांना घरे तसेच इतर योजना मंजूर झाल्या आहेत त्यांची संपूर्ण यादी स्थायी समितीसमोर हजर करावी, असे अधिकाऱयांना सांगण्यात आले.
कोणत्याही परिस्थितीत योजना राबविताना गांभीर्य घेणे गरजेचे आहे. कारण अनुसूचित जाती-जमातींसाठी आलेल्या योजनांचा निधी इतरत्र वळविण्याचा प्रयत्न बऱयाच वेळा होत असतो. मात्र, असे न करता संबंधितांनाच योजना द्याव्यात, असे यावेळी सांगण्यात आले. मागील समितीने नको त्या ठिकाणी तसेच नको त्या लाभार्थींना योजना दिल्या आहेत, त्यामध्ये बदल करण्याचेही यावेळी सांगण्यात आले. एकूणच पहिल्याच बैठकीत अधिकाऱयांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी भाग पाडण्यात आले.
बैठकीला सामाजिक न्याय स्थायी समितीचे अध्यक्ष फकिराप्पा डी. हादण्णावर, सिद्धगौडा बाबुराव सुणगार, शिवाक्का देवाप्पा बेळवडी, सुरेश फकिराप्पा मॅगेरी, भारती बी. बुटाळे, शंकर बी. माडलगी, गोविंद बी. कोप्पद तसेच अधिकारी उपस्थित होते.









